करिअर क्राईम

टीईटी परीक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना सुपेंनी पैसे घेऊन केले पात्र; महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

पुणे:- आरोग्य सेवा गट ड आणि गट क पेपर फुटीनंतर म्हाडा भरतीचे पेपर फुटले होते. ही कारवाई होत नाही तोच आता पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपे यांनी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांच्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे.
म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या जी .ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी- चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं सापडली होती. त्यामुळे टीईटीच्या परीक्षेत घोटाळा झाला असल्याचा पोलिसांचा संशय बळावला होता. गुरुवारी सकाळपासून तुकाराम सुपेंना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर आज पुणे पोलिसांनी सुपे यांना अटक केली आहे. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे. जी. ए. टेक्नॉलॉजीकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरती प्रक्रियेचीही जबाबदारी होती. त्याचबरोबर प्रितेश देशमुख प्रमुख असलेल्या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळं या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशय निर्माण झाला आहे.
जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे या परीक्षांसाठी उमेदवारांना हॉल तिकीट देणे, पेपरची छपाई करणे, परीक्षा घेणे, पेपर जमा करणे, त्यांचं स्कॅनिंग करून त्याद्वारे गुण देऊन निकाल जाहीर करणे अशी सर्व प्रकारची जबाबदारी होती. पण ही कंपनीच गोपनियतेचा भंग करत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचं कंत्राट देणं किती धोकादायक आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!