बीड

बीड शहराच्या विकासात अमुल्य योगदान देणाऱ्या पंकजाताई मुंडेंना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार, बीडमध्ये आयोजित बैठकीत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी व्यक्त केला विश्वास

बीड | दिनांक २८।
बीड शहराच्या विकास कामात अमूल्य असे योगदान पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना दिलेले आहे.त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत बुद्धिभेद करून जातीवाद करणाऱ्या विरोधकांना जनता थारा देणार नाही. पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याचा विश्वास नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी व्यक्त केला. तर उमेदवार म्हणून मी जिल्ह्यातील जनतेला मान्य आहे आणि हेच माझ्या उमेदवारीचे यश आहे. पक्षाने माझ्यावर दिलेली उमेदवारी सार्थकी लावण्यासाठी तुम्ही सर्वजण येत्या 13 तारखेला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला विजयी करा, जिल्ह्याचा विकास करून
तुमच्या प्रत्येक मताची मी परतफेड करेल अशी ग्वाही याप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी दिली.

भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. या बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष सोहनी, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी बाबासाहेब देवरकर मामा, अभिजित चरखा आदींच्या हस्ते पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थितांशी संवाद साधताना पंकजाताई म्हणाल्या, मुंडे साहेब असताना अमर नाईकवाडे, त्यांचे बंधू व आम्ही सोबत काम केलेले आहे. जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आता आम्ही पुन्हा सोबत काम करत आहोत याचा खुप आनंद वाटतो.अमर नाईकवाडे यांनी अतिशय छान ठिकाणी ही बैठक घेतली. निवडणुकीत पक्षाने दिलेली माझी उमेदवारी तुम्हाला मान्य आहे का असा सवाल उपस्थितांना केला तेव्हा प्रत्येकाने होकार देत पंकजाताईंच्या उमेदवारी वर आनंद आणि समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, नेत्याचे महत्व वाढवण्यासाठी काही जण निवडणूक खूप कठीण आहे असे सांगत असतात.मात्र ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर आपण पुढे घेऊन जात आहोत. जातिवादाला आपण कधी थारा दिला नाही. ठीकठिकाणी प्रचारासाठी जाते तेव्हा लोक मला भेटतात, मी केलेल्या विकास कामांची माहिती देतात, त्यामुळे जनतेनेच माझी ही निवडणूक हाती घेतली आहे.
आता आठ दहा दिवस प्रचाराचे राहिले आहेत मी नम्रपणे तुम्हाला आवाहन करते की मला तुम्ही मतदान करा.ते यासाठी करा की, मी तुमच्या विकासासाठी लायक उमेदवार आहे हे तर तुम्हाला मान्य आहे, मला का निवडून द्यावे की मी विकास केलाय, विविध विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत आणि भविष्यात पण लावू शकते याचा तुम्हाला विश्वास आहे असे सांगत पंकजाताई म्हणाल्या, रेल्वे काम लवकरच पूर्ण होईल,रोजगार, उद्योग वाढवण्यासाठी काम करेल याची खात्री आहे. बुद्धिभेद करणाऱ्यापासून सावध रहा.जात नावाची गोष्ट पाच वर्षांनी निवडणूक आली की समोर येत असते. मी समोरच्या उमेदवाराबद्दल काही बोलणार नाही,कारण मागच्या निवडणुकीत पाच लाख मते घेतल्यानंतर पराभूत झाल्यावर ते पुन्हा कधी जनतेत आले नाहीत. जिल्ह्यातील जनता विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि विकास केवळ भाजप महायुतीचा सरकार करू शकते हेही जनतेला माहित आहे त्यामुळे येत्या 13 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले.

बीडच्या विकासात मुंडे परिवाराचे योगदान

बैठकीच्या सुरवातीला प्रास्ताविक करताना अमर नाईकवाडे म्हणाले, पंकजाताई अतिशय योग्य उमेदवार आहेत.आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीत जातीवाद पहायला मिळाला नाही मात्र या निवडणुकीत विरोधकांकडून जातीवाद पुढे केला जात आहे. मात्र बीड शहरातील नागरिक सुज्ञ आहेत,ते अशा गोष्टींना महत्व देणार नाहीत.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे दुःखद निधन झाले नसते तर आज बीड जिल्ह्याचे चित्र खूप वेगळे दिसले असते. बीड शहराच्या विकासासाठी मुंडे परिवाराचे अमूल्य योगदान राहिलेलं आहे. बीड शहरासाठी पाचशे कोटींचा निधी पंकजाताई पालकमंत्री असताना मिळाला, रस्ता कामासाठी शंभर कोटींचा निधी मिळाला, हे विसरून चालणार नाही. खासदार प्रीतम मुंडे यांनी खासदार निधीतून जालना रोडच्या कामासाठी निधी दिला होता. बीड शहरासह जिल्ह्यातील रस्ता कामासाठी पंकजाताई यांनी निधी दिला. सोलापूर-धुळे महामार्ग तयार करताना केंद्र सरकारने चार पट मावेजा शेतकऱ्यांना दिला.

मुंडे भगिनींनी बीड शहराच्या अटल पाणी पुरवठा योजनेसाठी निधी दिला पण त्यांनी त्याचा कधीही बडेजावपणा केला नाही. दुसरीकडे विरोधात असलेल्या उमेदवाराला स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आणता आले नाही, ते मुंडे परिवारावर आता या निवडणुकीत टीका करत आहेत,

मराठा आरक्षण विरोधातील ओबीसी मेळाव्यात पंकजाताई कधीही उपस्थित राहिल्या नाहीत याची पण समाजाला जाणीव आहे. म्हणूनच कुठलाही भेदभाव न करता विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्या उपकाराची परतफेड करायची वेळ आता आपल्या सर्वांची आहे त्यामुळे सर्वांनी भूलथापांना बळी न पडता पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असं आवाहन त्यांनी केलं.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!