क्राईम

एक वर्षापूर्वीच्या दरोड्यातील फरारी आरोपीला अटक

crime
नवीन एसटी स्टॅंडसमोर राहणाऱ्या माने कुटुंबीयांच्या घरावर एक वर्षापूर्वी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील फरार संशयित विजय लहान्या शिंदे (रा. नेर, ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्याच गावातून शुक्रवारी अटक केली. वडूज न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातारा  -पुसेसावळी (ता. खटाव) येथील नवीन एसटी स्टॅंडसमोर राहणाऱ्या माने कुटुंबीयांच्या घरावर एक वर्षापूर्वी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील फरार संशयित विजय लहान्या शिंदे (रा. नेर, ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्याच गावातून शुक्रवारी अटक केली. वडूज न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी, पुसेसावळी येथील माने कुटुंबीयांच्या घरावर एक वर्षापूर्वी सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी शस्त्रांच्या धाकाने सव्वालाख रुपयांचे दागिने लुटले होते. शिवाजी माने व सौ. शारदा हे दाम्पत्य गावात खानावळ चालवत होते. ते दि. 16 जून 2019 रोजी खानावळ बंद करून रात्री झोपले होते. पाच दरोडेखोरांनी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाला जोराचा धक्का मारून तो उघडला.

घरात प्रवेश केल्यावर दरोडेखोरांनी माने दाम्पत्याला लाकडी दांडके व चाकूने मारहाण करून घरातील सव्वालाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. दरोडेखोरांच्या मारहाणीत माने दाम्पत्य जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी या दरोड्यातील चार संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यातील दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

इतर दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. तेव्हापासून विजय शिंदे व आणखी दोन संशयित फरार होते. या सर्व संशयितांविरुद्ध “मोक्का’ कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तपास करून मोक्‍का न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

यातील मुख्य सूत्रधार विजय शिंदे हा त्याच्या गावी नेर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक करून महामुनी यांच्या ताब्यात दिले.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, ज्योतिराम बर्गे, तानाजी माने, विजय कांबळे, नितीन गोगावले, रवींद्र वाघमारे, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, विजय सावंत, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.

जिल्हा मोक्का न्यायालयातील महामुनी पहिले तपासी अधिकारी
यापूर्वी मोक्का लावलेल्या संशयितांना पुणे येथील विशेष मोक्‍का न्यायालयात हजर केले जात होते; परंतु त्या त्या जिल्ह्यातील सत्र न्यायालयातच यापुढे मोक्कातील आरोपी हजर करण्याचा आदेश शासनाने नुकताच काढला आहे. त्यानुसार सातारा येथील मोक्का न्यायालयात हजर केलेला शिंदे हा पहिला संशयित तर बी. बी. महामुनी हे पहिले तपासी अधिकारी आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!