क्राईम धारूर

नात्यातील महिलेसोबत लग्न केल्याच्या रागातून एकाचा दगडाने मारहाण करून खून, तीन वर्षांने चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल


केज, दि. 12 (लोकाशा न्यूज) : नात्यातील महिलेस पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न केल्याचा राग मनात धरून पैशाचे व्यवहारावरून एका इसमाला दगडाने मारहाण केली. उपचारासाठी रुग्णालयात पाठविल्यानंतर या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना 3 एप्रिल 2020 रोजी गांजपूर (ता. धारूर ) येथे घडली होती. या घटनेनंतर तीन वर्षाने चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
        बनकारंजा (ता. केज) येथील फिर्यादी सिंधु जनक नागरगोजे या महिलेचा मयत भाऊ शिवाजी मारुती बांगर हा सन 2018 मध्ये कर्नाटकमधील गलगली कारखाना येथे त्याच्या पहिल्या पत्नीसोबत ऊसतोडणीसाठी गेला होता. त्यावेळी त्याचे सोबत असलेल्या कौशल्या संतोष खाडे (रा. खाडेवाडी) हिचे सोबत शिवाजी बांगर याची ओळख झाली होती. त्यानंतर कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर ते गावी आले. दोन-तीन दिवसांनी शिवाजी बांगर व कौशल्या खाडे हे दोघे जण पळून पुणे येथे गेले होते. लॉकडाऊनमुळे ते पुणे येथेच दोन वर्षे राहिले.  त्यानंतर गावी बनकरंजा येथे आले होते. कौशल्या ही त्यांच्या गावातील बाबासाहेब तुळशीराम नागरगोजे (लांब) यांचे जवळचे नात्यातील असल्याने बाबासाहेब तुळशीराम नागरगोजे (लांब), दिलीप बाबासाहेब नागरगोजे (लांब), बालासाहेब बाबासाहेब नागरगोजे (लांब) (सर्व रा. बनकरांजा), दत्ता रामचंद्र मैंद (रा. मैंदवाडी ता.धारुर) हे शिवाजी याचे घरी आले होते. तु कौशल्या हिचे सोबत लग्न का केलेस असे म्हणून तुला पुढचा गुढी पाढवा पाहू देणार नाहीत असे म्हणून शिवीगाळ केली होती. 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजता या चौघांनी येऊन पहिल्या टोळीचा हिशोब करायचा असे गोड बोलून शिवाजी बांगर यास पुढे घालून दुचाकीवरून चिंचपूर गावाचे दिशेने निघून गेले होते. त्यानंतर शिवाजी हा गांजपूर येथे शाळेजवळ दुचाकीवरून पडल्याने त्यास धारुर येथील दवाखाण्यात पाठविले, तेथून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या दवाखान्यात घेऊन गेले. दुसर्‍या दिवशी 3 एप्रिल 2020 रोजी दुपारी 1.50 वाजता शिवाजी बांगर यांचा मृत्यू झाला. अंबाजोगाईला दवाखान्यात नेताना जखमी शिवाजी बांगर याने आपल्या वडिलांना दिलीप बाबासाहेब लांब व दता रामचंद्र मैंद यांनी कौशल्या सोबत का लग्न केल्याचा राग मनात धरुन व पैशाचे कारणावरुन गांजपूर शिवारात शाळेजवळ शिवाजीला दगडाने मारल्याचे सांगितले. 11 फेब्रुवारी रोजी सिंधू नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब नागरगोजे (लांब), दिलीप नागरगोजे (लांब), बालासाहेब नागरगोजे (लांब), दत्ता मैंद या चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे पुढील तपास करीत आहेत. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!