बीड

रुग्णांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन; प्रशासनाने जारी केले संपर्क क्रमांक



बीड, दि.15 (लोकाशा न्यूज) : कोविड -19 च्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे . जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस भयावह पद्धतीने वाढत असून काही तालुक्यातील संक्रमणाचे प्रमाण हे अत्यंत मोठे आहे . अशा परिस्थितीमध्ये प्रशासन हे सर्व मार्गानी या आपत्तीला तोंड देण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करत असून ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत किंवा अत्यंत सोम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांकरिता कोविड केअर सेंटर ची स्थापना करण्यात आलेली असून ज्या रुग्णांना कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घ्यावयाचे आहेत अशा रुग्णांकरिता प्रत्येक तालुक्याच्या पातळीवर पुरेशा संख्येने कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात आली आहेत . त्याचबरोबर कोविड हेल्थ केअर सेंटर आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून मध्यम किंवा तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना करीता ऑक्सिजनचा पुरवठा असलेले बेड त्याचबरोबर तज्ञ वैद्यकीय डॉक्टरांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत , या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जीवित हानी टाळणे , समूह संसर्ग रोखणे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या रुग्णांची उपचाराअभावी हाल न होता त्यांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे . प्रत्येक तालुका पातळीवर कोविड विषाणूच्या अनुषंगाने सर्व प्रकारची माहिती देऊन अडचणींचे निराकरण करण्यासाठी कोविड काळजी केंद्र किंवा मध्यम आणि तीन लक्षणांच्या उपचाराकरीता डिस्ट्रिक्ट हेल्थ केअर सेंटर आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल याबाबतची माहिती त्याचबरोबर औषधांचा पुरवठा अशा सर्वच बाबींची काळजी घेण्याकरिता एक नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे . याठिकाणी 24×7 नियंत्रण कक्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने तालुका पातळीतील कोणत्याही गावी असलेल्या कोणत्याही रुग्णाला, त्याच्या नातेवाईकांना अथवा नागरिकांना काही माहिती हवी असल्यास किंवा प्रशासनाला काही सूचना द्यावयाचे असल्यास अथवा एखाद्या घटनेबाबत माहिती द्यावयाची असल्यास त्या करिता निश्चित करण्यात आलेले संपर्क क्रमांक या बातमी बरोबर प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवरती असाच कोविड नियंत्रण कक्ष 24X7 कार्यान्वित करण्यात आलेला असून तो या पूर्वीपासून सुरू आहे . या नियंत्रण कक्षात जिल्हा पातळीवर कोव्हीड -19 रुग्णांकरिता उपलब्ध असलेली रुग्णालये आणि रिक्त खाटा ( बेड ) यांची माहिती , प्रशासनाकडून आवश्यक असलेली माहिती , सूचना किंवा कोणत्याही घटनांबाबत प्रशासनाला अवगत करावयाची असल्यास त्याबाबतचा संपर्क क्रमांक 02442-222604 वर तसेच औषधांच्या अनुषंगाने औषधे व रेमडिसीवर या इंजेक्शन उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षातील मोबाईल क्रमांक 8446165371 वर संपर्क साधता येणार आहे.

नागरिकांना आवाहन
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , आपल्या सर्वांच्या सोयीकरिता आणि आपल्या सर्वांच्या सुविधाकरिता बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेल्प लाईन डेस्क अर्थात नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला असून कोणत्याही प्रकारची मदत मिळवण्यासाठी सदरच्या कक्षाशी आपण संपर्क करू शकतात . सर्व नागरिकांनी या कालावधीमध्ये शिस्तबध्द पद्धतीने आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने वारंवार आवाहन केल्याप्रमाणे फक्त अत्यंत तातडीच्या वेळी घराबाहेर पडावे ज्येष्ठ नागरिक गंभीर आजाराने बाधित असलेले रुग्ण त्याचबरोबर मधुमेह , रक्तदाब आणि अन्य विकारांनी ग्रस्त असलेले नागरिक , लहान मुले यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे . त्याकरिता त्यांनी घरातच राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे . त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर राखले जाईल , मुखपट्टीचा ( मास्क ) वापर केला जाईल याची दक्षता घ्यावी . लसीकरणासाठी नागरिकांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा . ज्येष्ठ नागरिकांनी आणि 45 वर्ष पुढील सर्व नागरिकांनी आपले लसीकरण तात्काळ करून घ्यावे . त्याचबरोबर या आपत्तीच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवा सामाजिक माध्यमांद्वारे पसरत असतील तर त्या अफवांची खातरजमा करून घ्यावी . याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी आणि अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीना वेळीच पायबंद घालावा . नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे . बीड जिल्ह्यातील सुजाण नागरिकांच्या मदतीने या आपत्तीवर आपण मात करू आणि सर्वजण एक दिलाने प्रयत्न करू असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!