बीड

पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्धार, मुस्लिम बांधवांना विकास आणि संरक्षण दोन्हीही देण्याची जबाबदारी माझी – पंकजाताई मुंडे, दिंद्रुड येथे साधला मनमोकळा संवाद ; तेलगाव येथे मतदारांच्या घेतल्या भेटी

दिंद्रुड/ तेलगाव ।दिनांक ०२।
लोकनेते मुंडे साहेबांना मुस्लिम बांधवांनी नेहमीच साथ दिली आहे, तशीच साथ मलाही मिळत आहे. विरोधक भूलथापा मारुन मुस्लिम बांधवांना भाजपच्या विरोधात घाबरवतात पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या केसालाही धक्का लागला तर सर्वात अगोदर मी पुढे येईल. काळजी करू नका, तुमचा विकासच तर मी करेनच पण तुमचे संरक्षणही करण्याची जबाबदारी मी घेते असा विश्वास भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी येथे बोलतांना दिला.

पंकजाताई मुंडे यांनी आज दिंद्रुड व तेलगाव येथे मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. दिंद्रुड येथे ईद ए-मिलाद कार्यक्रमात मुस्लिम बांधवांना त्यांनी मनमोकळा संवाद साधत शुभेच्छा दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आ. प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे, मौलाना फारूक, शेख अखिल, चांदभाई, शिवाजी बडे, नईम शेख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माझ्या नावापुढे गोपीनाथ मुंडेंचे नाव लागले आहे. मी सर्व जाती धर्मावर नेतृत्वाची सावली होईन, त्यामुळे तुमची लेक म्हणून मला मतांची ओटी भरा. माझा विजय म्हणजे तुमचा विजय आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे म्हणून या निवडणूकीत सन्मानाचा विजय मिळवून देण्यासाठी भरघोस मतांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा. मी मंत्री असताना केलेला विकास तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला आहे. माझ्याविषयी कुणाच्या मनात राग लोभ नाही. भविष्याचा विचार करा मला पाच वर्षे द्या. रोजगार, उद्योगासह पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबध्द राहील. सर्वांचा समान विकास करेन. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार विराजमान होणार आहे. अशावेळी या भव्य विजयात आपलाही हिस्सा असावा यासाठी मला संधी द्या. मी कायम विकासासोबत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. अल्पसंख्याकांवर अन्याय होत असेल तर मी तुमच्या हक्कासाठी अगोदर पुढे येईल.मी मायनॉरिटी आहे पण काम मेजॉरिटीचे करते असं त्या म्हणाल्या.

विकासासाठी पंकजाताईंना साथ द्या – आ.सोळंके

प्रारंभी आ.प्रकाश सोळंके यांचे भाषण झाले. सत्तेत असताना पंकजाताईनी सर्व गावांना, सर्व जाती-धर्माला विकासाची समान संधी दिली. भेदभाव न करता सर्वांना निधी दिला. बीडचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंकजाताईंना निवडून देणं गरजेचं आहे असं ते म्हणाले.

पंकजाताईंच्या विजयासाठी हाडाची काडं करू – पोटभरे

बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे म्हणाले, पंकजाताई मुंडेंकडे विकासाचे व्हिजन आहे. त्या लोकनेते मुंडे साहेबांच्या राजकीय वारसदार आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या विजयासाठी हाडाचे काड करून त्यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ.

तेलगाव येथे भेटीगाठी

पंकजाताई मुंडे यांनी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड, तेलगाव येथे मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. या ठिकाणी पंकजाताईंच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत खंबीरपणे पाठीशी राहू असा शब्द दिला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!