धारूर

आशा स्वयंसेविका अंजली मगर यांच्या उत्कृष्ट कर्तव्याची आरोग्य विभागाने घेतली दखल ! धारूर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर


धारूर, दि. 30 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील आवरगाव हे आर.आर.पाटील (आबा) स्मार्ट ग्रामच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आले आहे. विषेश म्हणजे गावाबरोबरच या गावातील प्रत्येक नागरिक, शासकिय अधिकारी आणि कर्मचारी स्वत:चे कर्तव्य अत्यंत चोखपणे पार पाडत आहेत. या स्मार्ट गावात उत्कृष्ट कर्तव्य बजावणार्‍या आशा स्वयंसेविका अंजली बंकट मगर (नखाते) ह्या धारूर तालुक्यात प्रथम आल्या आहेत. त्यांच्या कामाची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली असून या कामाबद्दलच आरोग्य विभाग त्यांचा सन्मान करणार आहे. सध्या त्या भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आपले कर्तव्य बजावत आहेत.
जिल्हा परिषदेच्या तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी सन 2019-20 या वर्षीतील उत्कृष्ट कर्तव्य बजावणार्‍या आशा स्वयंसेविका यांना प्रथम, व्दितीय आणि तृतीय असे तीन पुरस्कार जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील जवळपास 22 आशा स्वयंसेविकांना सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षात उत्कृष्ट कर्तव्य बजावल्याबद्दलच आवरगाव येथील अंजली बंकट मगर (नखाते) यांना धारूर तालुक्यातील प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोख चार हजार रूपये आणि सन्मानपत्र देवून आरोग्य विभाग त्यांचा गौरव करणार आहे. त्यांच्याकडे देण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी त्या अत्यंत प्रमाणिकपणे पार पडतात, हे सातत्याने त्यांच्या कामातून आरोग्य विभागाला पहायला मिळालेले आहे. त्यामुळेच आरोग्य विभागानेहीे त्यांच्या ह्या कामाची दखल आपल्या शासकिय दफ्तरामध्ये पुरस्काराच्या माध्यमातून केली आहे. तर त्यांच्या ह्या बहुमानाने पुन्हा एखदा आवरगावचे नाव तालुकास्तराबरोबरच जिल्हास्तरावर पोहचले आहे. या यशाबद्दल गावाच्या सरपंच पद्मीनीबाई जगताप, राष्ट्रवादीचे युवा नेते अमोल जगताप, ग्रामसेवक बाळू झोंबाडे यांच्यासह संपुर्ण ग्रामस्थ, आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग आणि संघटनेकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. दरम्यान भोगलवाडी केंद्राअंर्तगत जाहागीर मोहा येथील जयश्री पांडूरंग सुकाळे यांचा द्वितीय क्रमांकाने सन्मान करण्यात येणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!