बीड धारूर

भ्रष्ट मुख्याध्यापकाला सीईओंचा दणका, अंजनडोह केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक रमेश नखातेंना सेवेतून तडकाफडकी केले निलंबित

विभागीय चौकशी लागली, चौकशी पुर्ण झाल्यानंतर अपहाराची रक्कम वसूल होणार


बीड, दि. 31 (लोकाशा न्यूज) : भ्रष्टाचार करणार्‍यांना सीईओ अजित पवार हे सातत्याने कारवाईचे दणके देत आहेत. असाच एक दणका त्यांनी अंजनडोह (ता.धारूर) केंद्राच्या केंद्रीय मुख्याध्यापक रमेश नखाते यांना दिला आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सोमवारी सीईओंनी नखातेंना सेवेतून तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशीही लागली असून ही चौकशी पुर्ण झाल्यानंतर अपहाराची रक्कम वसूल केली जाणार आहे.
धारूर तालुक्यातील अंजनडोह जि.प.कें. प्रा. शाळेअंतर्गत केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून रमेश नखाते हे काम पाहत होते, मात्र मागच्या काही दिवसांपुर्वी त्यांनी शिक्षकांच्या वेतनातील आयकर (आठ लाख 46 हजार 346 रूपये) व एलआयसीच्या (89 हजार 670 रूपये) रक्कमेचा अपहार केल्याचे समोर आले. यासंदर्भात शिक्षणाधिकारी अजय बहिर यांच्याकडे तब्बल 55 शिक्षकांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेवून सीईओ अजित पवार यांनी सदर मुख्याध्यापकास सोमवारी सेवेतून तडकाफडकी निलंबित केले. तसेच त्या मुख्याध्यापकाची विभागीय चौकशीही लागली आहे. या चौकशीनंतर अपहाराची रक्कम सदर मुख्याध्यापकाकडून वसूल केली जाणार आहे. आता निलंबन काळात त्या मुख्याध्यापकाचे मुख्यालय माजलगावचे गटशिक्षणाधिकारी कार्यालय राहणार आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकार्‍यांच्या पुर्व परवानगीशिवाय त्या मुख्याध्यापकास मुख्यालय सोडता येणार नाही, वास्तविक पाहता सदर मुख्याध्यापकाचे उपस्थिती प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधिताचा निर्वाह भत्ता अदा करण्यात येवू नये, असे आदेश सीईओंनी धारूरच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. निलंबन काळात खासगी नोकरी अथवा उद्योग करता येणार नाही, सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, सदर आदेशाची नोंद सदर मुख्याध्यापकाच्या मुळ सेवा पुस्तीकेत घेण्यात यावी, असेही सीईओंनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता
सदर प्रकरणाची सीईओ अजित पवार यांनी गांर्भीयाने दखल घेतली आहे. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी तर होणारच असून भ्रष्टाचार प्रकरणी सदर मुख्याध्यापकावर गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!