बीड धारूर

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे डेंग्यूमुळे निधन; धारुर शहर हळहळले

अभियांत्रिकीचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील अॉपरेटर बाबासाहेब उर्फ नाना जगताप यांचे सुपुत्र ओम जगताप या विद्यार्थ्याचे अंबाजोगाई येथे डेंग्यू वर उपचार सुरु असताना निधन झाले. जगताप कुटूंबियांवर ओढावलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
धारुर शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आजाराची साथ सुरु आहे. कसबा विभागात डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. याभागातील नागरीकांनी यापुर्वीही अनेक वेळा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. डेंग्यू मुळे यापुर्वीही याभागात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
याच भागात राहणारे ओम बाबासाहेब जगताप (वय 19) या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस मंगळवारी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना प्रकृती खालावल्याने त्यास अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली.
अतिशय शिस्तप्रिय, अभ्यासू, शांत व संयमी स्वभावामुळे ओमची वेगळी ओळख होती. आज दि.20 शुक्रवारी सकाळी 9 वाजता धारुर येथील स्मशानभुमीत त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अकाली निधनामुळे सर्वस्तरातून दुःख व्यक्त होत आहे. जगताप कुटूंबियांच्या दुःखात लोकाशा परिवार सहभागी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!