बीड

परळीत दिव्यांग बांधवांनी दिले पंकजाताई मुंडेंना ‘विजयी भव’ आशीर्वाद, संसदेत दिव्यांग बांधवांचा आवाज बनून काम करेल, पंकजाताई मुंडेंच्या भाषणाने दिव्यांगही गहिवरले !

परळी वैजनाथ।दिनांक २२।
दिव्यांगांच्या जीवनात आनंद यावा यासाठी मी हात नसलेल्यांचे हात, दृष्टी नसलेल्यांची दृष्टी आणि शब्द नसलेल्यांचे शब्द होईल. तुमच्यात मला देव दिसतो. तुमच्यासाठी काही तरी करू शकेल एवढी शक्ती मला मिळावी. जीवात जीव असेपर्यंत तुमच्या सेवेसाठी कशाचाही विचार करणार नाही, तुमच्या आशीर्वादाने संसदेत तुमचा आवाज बनुन काम करेल अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज दिव्यांग बांधवांची मने जिंकली. पंकजाताईंच्या भाषणाने गहिवरून गेलेल्या दिव्यांग बांधवांनी त्यांना मनापासून ‘विजयी भव’ चे आशीर्वाद दिले. दरम्यान पंकजाताई हे आश्वासक आणि विश्वासक नेतृत्व असून मंत्री असताना त्यांनी दिव्यांगांसाठी निधी वाढवून दिला, आता त्यांचेसाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे, त्यांना मोठया मताधिक्याने संसदेत पाठवा असं आवाहन दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे उपाध्यक्ष डाॅ. संतोष मुंडे यांनी यावेळी केले.

पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ डाॅ  संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने मोंढा विभागात  दिव्यांग, विधवा, परितक्त्या, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिकांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जि.प. गटनेते अजय मुंडे, नगरसेविका उमाताई समशेट्टे, शुभांगी गिते आदी याप्रसंगी उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीने खचाखच भरलेल्या या संवाद बैठकीस मार्गदर्शन करताना पंकजाताई म्हणाल्या, तुमची एवढी मोठी संख्या मला अंतर्मुख करणारी आहे. कलियुगात आज कुणीही समाधानी नाही, तुमच्याकडे पाहून मला तुमच्यात देव दिसतो, किती हा उत्साह..असेच आशीर्वाद मला द्या. राजकारणात आज जातीवरून एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या जगात तुमच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे. ज्ञान आणि पैसा देण्याएवढी मी मोठी नाही पण तुम्हा सर्वांना विश्वास मात्र नक्की देईन.

संसदेत तुमचा आवाज होईल

दिव्यांगांची सेवा ही सामाजिक कार्य करणाऱ्यांसाठी संधी आहे. समाजातील दुर्लक्षीत घटकांसाठी कार्य करण्याची शिकवण मला लोकनेते मुंडे साहेबांकडुन मिळाली आहे. खा.प्रितमताई यांनी खूप छान काम केलं. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांगासाठी शिबीर घेवुन अनेक उपक्रम राबवत कृत्रिम अवयव, सायकल, कर्णबधीरांना कानाच्या मशिन असे साहित्य वाटप केले. तुमची साथ मिळाल्यास संसदेत तुमचा आवाज बनून काम करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटून दिव्यांगाच्या समस्या त्यांच्या कानावर घालत प्रभावी योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
राज्यात मी मंत्री असताना महिला बचतगटांना प्रोत्साहन देत शुन्य टक्के दराने कर्ज,महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन दिली.दिव्यांगासाठी नगरपालिका व ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मध्ये 5% स्वनिधी राखीव ठेवण्याचा निर्णय,दिव्यांगांच्या मानधनात वाढ असे निर्णय घेतले. महिला व दिव्यांग व्यक्तीसाठी अनेक उपक्रम राबविले असल्याचे पंकजाताईंनी सांगितले.

दिव्यांग भवन उभारणार

दिव्यांग बांधवांची संख्या मोठी असुन त्यांना आपल्या हक्काच्या जागेत बसुन काम करता यावे यासाठी परळी शहरात लवकरच दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी भवन उभारणार असल्याचे पंकजाताई म्हणाल्या.

ताई तुम्ही उमेदवार नव्हे,खासदारच ; दिव्यांगांनी दिला आशीर्वाद

दिव्यांगांशी संवाद साधतांना स्वतः पंकजाताई गहिवरून गेल्या. अतिशय मनमोकळा संवाद साधत त्यांनी त्यांची मने जिंकली. प्रचंड उकाडा होत असतानाही पंकजाताईंचे मार्गदर्शन ऐकताना असंख्य दिव्यांग व्यक्ती विशेषतः महिला भावनिक झाल्या होत्या. ताई, तुम्ही या निवडणुकीतील केवळ उमेदवारच नव्हे तर खासदार आहात. देशातुन सर्वाधिक मतांनी निवडुन येण्यासाठी आम्ही आणि आमचे आशीर्वाद सर्व तुमच्यासोबत आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!