बीड CORONA

‘थर्टी फस्ट’ व नूतन वर्ष घरीच साधेपणाने साजरे करा: जिल्हाधिकारी यांचे आवाहन; जिल्ह्यात निर्बंध लागू

कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेंबर 2021 वर्ष अखेर व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणानेे घरीच साजरे करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत.
याबाबत त्यांनी दिलेल्या परिपत्रकात त्यांनी म्हटले आहे, जिल्हयात 25 डिसेंबरपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे. ‘थर्टी फस्ट’ व नूतन वर्ष 2022 चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्केच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिग राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी निर्जतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.विशेषतः कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिकस्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये.ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व 31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष 2022 सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सर्व जिल्हावासियांना केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!