बीड

पीक कर्ज वाटपास बँका झाल्या गतिमान, कर्जापोटी आतापर्यंत 300 कोटी वाटले, वेळेत टार्गेट पुर्ण करण्यासाठी बँका आणखी गती वाढविणार


बीड, दि.23 (लोकाशा न्यूज) : पीक कर्ज वाटपास बँका अधिक गतिमान झाल्या असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी शेतकर्‍यांना 298 कोटी 57 लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. येणार्‍या काळात बँकांकडून पीक कर्ज वाटपाची गती आणखी वाढविली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतकर्‍यांना झपाट्याने पीक कर्ज उपलब्ध होत आहे, पीक कर्जासाठी शेतकर्‍यांना थोडाही त्रास होणार नाही, याअनुषंगाने प्रत्येक प्रक्रिया राबवा, अशा स्पष्ट सुचना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील प्रत्येक बँकेला दिलेल्या आहेत. त्यांच्या या आदेशाचे बँकांकडून तंतोतंत पालन होत असल्याचे समोर येत आहे. कारण जिल्ह्यातील बँकांनी आतापर्यंत 298 कोटी 57 लाख रूपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. अनेक बँका गावात जावून शेतकर्‍यांकडून पीक कर्जाचे अर्ज घेत आहेत. तर काही बँका प्रस्ताव घेवून आलेल्या शेतकर्‍यांचे कर्ज प्रकरण एका दिवसात मार्गी लावत आहेत. यावरूनच पीक कर्ज वाटपास बँका गतिमान झाल्याचे दिसून येत आहे, येणार्‍या काळात बँका आपल्या कामात आणखी गति वाढणार आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना होणार आहे.
—–
बँका-शेतकर्‍यांमधील दुवा म्हणून
जिल्हाधिकारी काम करू लागले
बँका आणि शेतकर्‍यांमधील दुवा म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे सध्या सक्षमपणे काम करीत आहेत. यामुळे जिल्ह्यातील बँका गतीने पीक कर्जाचे वाटप करीत आहेत.
—–
बँकेतच कागदपत्र मिळू लागल्याने
शेतकर्‍यांच्या अडचणी झाल्या दुर
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी शेतकर्‍यांना बँकेतच आठ अ आणि डिजीटल सातबारा’ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांच्या या आदेशाचे जिल्ह्यातील सर्वच बँकांकडून अंमल होताना दिसून येत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी दुर झाल्या आहेत.
—–
एकट्या जिल्हा बँकेने 126 कोटींचे कर्ज वाटले
डबघाईला आलेल्या डीसीसीला उभा करण्याचे काम जिल्ह्याच्या तात्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी खर्‍या अर्थाने केले, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दरवर्षी सुरूळीतपणे पीक कर्जही मिळू लागले, याही वर्षी या जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटपात चांगलीच आघाडी घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील शाखांमधून डीसीसीने तब्बल 126 कोटी 31 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!