बीड

आशा स्वयंसेविकांना 1500 तर गट प्रवर्तकांना 1700 रुपयांची वाढ, विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन मिळणार; आशा व गटप्रवर्तकांचा संप यशस्वी, महासंघाच्या रेट्यापुढे सरकार झुकले


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : राज्यातील आशा व गटप्रवर्तक आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून महासंघ आणि कृती समितीच्या नेत्रत्वाखाली संपावर होत्या. अखेर आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांच्या बेमुदत संप प्रकरणी तडजोड झाली असून 70 हजार कर्मचार्‍यांचा संप मागे घेण्यात आला आहे.
बुधवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने एम. ए. पाटील, डॉक्टर डी. एल. कराड, भगवान देशमुख, राजू देसले, शुभा शमीम, श्रीमंत घोडके, शंकर पुजारी, सुवर्णा कांबळे, राजेश सिंग यांच्यासह पदाधीकार्‍यांबरोबर चर्चा केली व संप प्रकरणी तडजोड घडवून आणली. झालेल्या समझोत्यानुसार आशाताईंना 1 जुलै 2021 पासून 1500/ व गटप्रवर्तकांना 1700/ रुपये दरमहा रुपये वाढ मिळणार आहे. त्यापैकी माहिती संकलन व सादरीकरण या कामी आशांना दरमहा 1000/ व गटप्रवर्तकना 1200/ रुपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ असून 500/ रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळणार आहे. तसेच पुढील वर्षी 1 जुलै 2022 पासून आशा व गटप्रवर्तकांना 500/ रुपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ मिळणार आहे. या प्रकारे आशाना 2000/ व गटप्रवर्तकांना 2200/रुपये वाढ मिळण्याचा समझोता बुधवारी करण्यात आला. आशा व गटा प्रवर्तकांच्या कामकाजाबाबत व सेवाशर्ती बाबत अभ्यास करण्यासाठी यशदाची समिती नियुक्त करण्यात येईल व या समितीवर आशा व गटप्रवर्तक संघटनांचे प्रतिनिधी असतील. राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका नगरपंचायतीने कोविड कामासाठी आशा व गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शिफारस करण्यात येईल. व्हॅक्सिनेशनच्या मोहिमेमध्ये सोशल मोबिलाइजर व ग्राउंड मॅनेजमेंट या प्रकारची कामे करण्यासाठी 200 रुपये प्रति दिन भत्ता देण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात रुग्णांना घेऊन जाणार्‍या आशा कर्मचार्‍यांसाठी आशा निवारा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आशा यांचे मानधन व मोबदला यांचा तपशील त्यांना लेखी देण्यात येणार आहे. कोरोना बाधित होऊन मयत झालेल्या आशा यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये विमा मिळण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात येईल. आशा व त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येईल. एक एन. एम व जीएनएमसाठी प्रशिक्षण देऊन भरती करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. आशा व गटप्रवर्तकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल. संपा केल्याबद्दल आशा व गटप्रवर्तक यांविरुद्ध कुठलीही कारवाई होणार नाही व वेतन किंवा मोबदल्यात कपात होणार नाही. या मागण्याबाबत एकमत होऊन बुधवारी समझोता करण्यात आला. महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने एम ए पाटील ,डॉक्टर डी एल कराड ,भगवान देशमुख, राजू देसले, शुभा शमीम, श्रीमंत घोडके, शंकर पुजारी, सुवर्णा कांबळे, राजेश सिंग यांनी चर्चेत भाग घेतला. शेवटी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संघटना प्रतिनिधींचे व संघटना प्रतिनिधींनी आरोग्य मंत्री राजेश टोपे ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ,उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे भगवान देशमुख, कमल बांगर, दत्ता देशमुख , सचिन आंधळे यांनी जाहीर आभार मानले.

आशा ताईंच्या लढ्याचा हा विजय – देशमुख

महासंघ आणि महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या लढ्याचा हा विजय आहे, आम्ही सातत्याने आशांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारत आहोत. आमच्या लढ्याला आज मोठे याश मिळाले आहे. यापुढे आम्ही न्याय हक्कासाठी लढा देणार आहोत. संप यशस्वी झाल्याने आजपासुन सर्वानी काम सुरु करावे, असे कृती समितीचे निमंत्रक भगवान देशमुख यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!