बीड

आ.सुरेश धस यांनी रूग्ण सेवेसाठी दिले 40 लाख

बीड/प्रतिनिधी: कोरोनाच्या रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना ने-आण करण्यासाठी रूग्णवाहिकेची गरज लक्षात घेवून भाजप आ.सुरेश धस यांनी राजकारण बाजुला सारत दोन रूग्णवाहिकांसाठी ‘स्थानिक विकास कार्यक्रम सन 2021-22’ अंतर्गत 40 लाख रूपयांच्या निधीचे पत्र जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे दिले आहे. सध्या, राजकारण, आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नसून प्रत्यक्ष कृतीची वेळ असल्याचे आ.सुरेश धस यांनी दाखवून दिले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा विखळा वाढत असून रोज हजाराच्या घरात रूग्णसंख्या नवीन सापडत आहे.अशावेळी आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून आता सर्वांनी पुढे येवून कोरोनाला हरविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात रूग्णांची संख्या वाढत असून रूग्णांना ने-आण करण्यासाठी रूग्णवाहिकांची कमतरता भासत आहे. ही गरज लक्षात घेवून जिल्हा परिषद सदस्य ॲड.प्रकाश कवठेकर यांनी पाटोदा येथील ग्रामीण रूग्णालयासाठी रूग्णवाहिकेची मागणी आ.सुरेश धस यांच्याकडे केली होती. तर आष्टीतही रूग्णांना रूग्णवाहिकेची गरज असल्याचे समोर येत होते.रूग्णालयात वेळेवर उपचार होण्याबरोबरच रूग्णांना घरापासून रूग्णालयात दवाखान्यात नेण्यासाठी अत्याधुनिक रूग्णवाहिकेची गरज होती. आ.सुरेश धस यांनी सरकार, राजकारण बाजुला ठेवत स्थानिक विकास कार्यक्रम योजनेमधून आष्टी, पाटोदा येथील ग्रामीण रूग्णालयासाठी प्रति एक रूग्णवाहिका देण्यासाठी प्रति 20 लक्ष, असे 40 लक्ष रूपयांच्या कामांना प्रशासकिय मान्यता देण्यात यावी, असे पत्र जिल्हा नियोजन अधिकारी यांना शुक्रवारी दिले आहे.आष्टी-पाटोदा तालुका डोंगराळ भाग असून याठिकाणी वाहनांची कमतरता आहे. अशावेळी आ.सुरेश धस यांनी प्रस्तावित केलेल्या रूग्णवाहिकेचा रूग्णांना मोठा फायदा होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!