करिअर

सत्तर लाख विद्यार्थी ‘शालाबाह्य’ ठरण्याचा धोका!

ऑनलाईन शिक्षणात येत असलेल्या विविध अडचणींमुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांतील जवळपास 40 टक्के म्हणजेच 70 लाख विद्यार्थी यंदा ‘शालाबाह्य’ ठरण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. कोरोनाचा घाला आणि संपर्क सुविधांच्या अभावामुळे आजपर्यंत शिक्षणातही मोठी गळती सुरू झाली असून, राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अनिश्‍चित बनले आहे.

राज्यामध्ये शासकीय आणि अशासकीय मिळून एकूण 1 लाख 4 हजार 971 प्राथमिक शाळा असून, या ठिकाणी 1 कोटी 59 लाख 85 हजार 712 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्यातील 25 हजार 737 माध्यमिक शाळांमध्ये 66 लाख 14 हजार 654 विद्यार्थी आहेत. राज्यातील 9,414 महाविद्यालयांमध्ये 21 लाख 29 हजारांवर विद्यार्थी संख्या असून, त्यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या कक्षेत येणार्‍या सर्व विद्यार्थ्यांची संख्या 2 कोटी 31 लाखांहून अधिक होते.   सध्या कोरोनामुळे राज्यातील बहुतेक सगळ्या शाळा बंद असल्या, तरी झाडून सगळ्या शाळांचे पहिली ते दहावी आणि बारावीच्या वर्गांचे ऑनलाईन अध्ययन चालू झाले आहे. मात्र, या ऑनलाईन अध्ययनात असंख्य अडचणी येताना दिसत आहेत. मुळात या ऑनलाईन वर्गांशी संबंधित सरासरी 40 टक्के म्हणजे 92 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याची किंवा मोबाईल फोनच नसल्याची बाब एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कोरोनामुळे सध्या राज्यातील हजारो पालकांच्या नोकर्‍या गेल्या, उद्योगधंदे बसले. त्यामुळे असे पालक आवश्यकता आणि इच्छा असतानासुद्धा आपल्या पाल्यांना स्मार्टफोन देऊ शकत नाहीत.

सध्या राज्यभरातील शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू असले, तरी या आपत्कालीन अध्ययन योजनेचे संबंधित शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण मिळालेले नाही. आपत्कालीन परिस्थितीत मिळेल त्या जुजबी ज्ञानावर आधारित राहून हे अध्ययन सुरू आहे. त्यामुळे त्यामध्ये सुसूत्रता किंवा नियोजनबद्धता दिसून येत नाही. शिवाय, असे ऑनलाईन वर्ग सुरू झाल्यानंतर लगेचच झाडून सगळे विद्यार्थी त्या त्या वर्गांना ‘कनेक्ट’ होतीलच, अशी कोणतीही खात्री देता येत नाही. कारण, कधी कुठे वीज उपलब्धतेचा, तर कुठे मोबाईल संपर्क यंत्रणेतील अडथळा उभा राहताना दिसतो. अशाप्रसंगी संबंधित विद्यार्थी किमान त्या काळापुरते तरी त्या त्या ऑनलाईन वर्गापासून आणि शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमापासून ‘डिस्कनेक्ट’च राहताना दिसतात. दुसरी बाब म्हणजे, या ऑनलाईन वर्गांवर शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्‍तिक लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शरीराने ऑनलाईन वर्गात आणि मनाने भलतीकडेच भरकटताना दिसतात. शिवाय, ऑनलाईन वर्गात आजघडीला तरी केवळ अध्ययन आणि अध्यापन एवढेच सुरू आहे, मूल्यमापनाचा कुठे थांगपत्ताही दिसून येत नाही.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने 20 जुलैपासून दूरदर्शनवर ‘टिली-मिली’ ही शैक्षणिक वर्गांची मालिका सुरू केली. दररोज अर्धा तास प्रत्येक इयत्तेच्या एका विषयाचे धडे या माध्यमातून देण्यात येत आहेत. मात्र, ज्या त्या विद्यार्थ्याच्या या द‍ृश्यवर्गांच्या कालावधीत त्या त्या भागात वीज उपलब्ध असेलच असेही नाही. ग्रामीण भागात तर ही समस्या अधिकच तीव्र आहे. शिवाय, या द‍ृश्यवर्गांशी संबंधित प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी टी.व्ही. उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचाही फार मोठ्या प्रमाणात लाभ होताना दिसत नाही. मोबाईल सुविधा उपलब्ध नसणारे 15 ते 20 टक्के विद्यार्थीच योजनेचा लाभ घेताना दिसतात. या परिस्थितीत यंदा राज्यातील पहिली ते बारावी या वर्गातील 30 टक्के म्हणजे जवळपास 70 लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची चिन्हे आहेत.

पाच लाख विद्यार्थी ‘संपर्काबाहेर’!

ऑनलाईन वर्गांशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2.12 टक्के म्हणजे जवळपास 4 लाख 89 हजार विद्यार्थी ऑनलाईन वर्गांच्या अजिबातच संपर्कात आले नसल्याचे स्पष्ट होत आहे. याचा अर्थ एक तर या विद्यार्थ्यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षाला वेगवेगळ्या कारणांनी दांडी तरी मारली आहे किंवा हे ऑनलाईन अध्ययन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यातच कमी पडले आहे. हा प्रकार चिंताजनक आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!