करिअर बीड

परीक्षार्थींना दिलासा, आता ‘या’ तारखांना आरोग्य विभागाची परीक्षा होण्याची शक्यता, राजेश टोपेंनी दिली माहिती

मुंबई : आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. तसेच पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, हीच परीक्षा येत्या 15 -16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
ऑक्टोबर महिन्यात आरोग्य विभागाची परीक्षा आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात होती. भाजपनेदेखील याच मुद्द्याला घेऊन रान उठवलं होतं. परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता हीच परीक्षा कधी होणार हे टोपे यांनी सांगितले आहे. 15-16 किंवा मग 22-23 ऑक्टोबरला आरोग्य विभागाची परीक्षा होण्याची शक्यता आहे, असे टोपे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर येत्या दहा दिवसांत सर्व परीक्षार्थींना नव्याने प्रवेशपत्र दिले जातील, असेदेखील टोपे यांनी सांगितले आहे.

परीक्षा होणारच- राजेश टोपे
राज्यात 25 आणि 26 सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर “एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलं आहे. त्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. कुठल्याही परिक्षार्थींची गैरसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण काय ?
आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामागे सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देण्यात आलेले आहे. तशा काही तक्रारीसुद्धा समोर आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना तर थेट परराज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र मिळालेले नाही. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर फोटो, केंद्र आणि वेळ देण्यात आलेला नाही. तसेच दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणं शक्य नाही, अशा काही अडचणी समोर आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सहा हजार दोनशे पदांसाठी परीक्षा
दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!