करिअर

२१ सप्टेंबरपासून शाळांना परवानगी, केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली : गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २१ सप्टेंबरपासून अंशत: सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून, नववी ते बारावीच्या वर्ग घेण्यासाठी मार्गदर्शक नियामावली (स्ँटडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) मंगळवारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केली. शाळेत येणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे.
‘केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक लागू केले आहे. येत्या २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक रीतीने पुन्हा शाळांमध्ये येण्याची परवानगी देण्यात येत आहे,’ असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.
त्यासाठीची नियमावली अशी : शाळेचे कामकाज सुरू करण्याआधी वर्गखोल्या, प्रयोगशाळा, इतर सामूहिक वापराची ठिकाणे एक टक्का सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणाने स्वच्छ करून घ्यावे. ऑनलाइन वर्ग, टेलिकाउन्सिलिंग आणि इतर कामांसाठी ५० टक्के शिक्षक व कर्मचाऱ्यांना बोलावता येईल. कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीऐवजी पर्यायी स्पर्शरहित हजेरीची सोय करावी. शाळांच्या आवारात आणि आवाराबाहेर रांगा लावण्यासाठी सहा फूट अंतर सोडून मार्किंग करण्यात यावे. स्टाफ रूममध्येही सुरक्षित वावर पाळावा.
शक्यतो शिक्षक उघड्यावर वर्ग भरवावेत. समारंभ, खेळ, तसेच गर्दी होईल, असे कोणतेही उपक्रम करू नयेत. शाळेत राज्य हेल्पलाइन क्रमांक आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचे क्रमांक ठळकपणे लावणे बंधनकारक असेल. वातानुकूलन यंत्राचा वापर होत असल्यास तापमान २४ ते ३० अंशांच्या दरम्यान असावे. तसेच, आर्द्रतेचे प्रमाण ४० ते ७० टक्के असावे. शक्य तितकी मोकळी हवा वर्गांमध्ये राहू द्यावी. विद्यार्थ्यांचे लॉकर सुरक्षित वावराचे नियम पाळून वापरता येतील. जिमसाठीचे नियम लागू राहतील. जलतरण तलाव बंद राहतील.
हेच नियम प्रयोगशाळा आणि कार्यशाळांची गरज असणाऱ्या संस्था उदा. व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, उच्च शिक्षणसंस्था, तंत्रशिक्षण संस्था आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम संस्था यांना लागू राहतील, असे आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

असे असतील नियम…

  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यात कमान सहा फूट अंतर बंधनकारक
  • नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी
  • शाळेत येणे बंधनकारक नसून, ऐच्छिक
  • प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शाळाच उघडता येणार
  • प्रतिबंधित क्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना शाळेत येण्यास मनाई

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!