महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नांदेडमध्ये निधन

मुंबई दि01 :- राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मंगळवारी नांदेडमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते 104 वर्षांचे होते. त्यांचे भक्तगण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यात आहेत. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
देशभरात अहमदपूरकर महाराज म्हणून ते प्रसिद्ध होते. तर अनुयायी त्यांना आप्पा म्हणत असत. या वयामध्येही त्यांच्यातील ऊर्जा आणि तत्परता अनुयायांना प्रेरणा देणारी होती. ते शेवटपर्यंत कार्यरत होते. एमबीबीएसची वैद्यकीय पदवी घेतलेल्या महाराजांचा अध्यात्माकडे कल होता. सांसारिक सुखांपासून अलिप्त राहून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. अध्यात्मिक आणि विज्ञाननिष्ठ संत अशीच त्यांची ओळख होती. अहमदपूर येथे त्यांनी भक्तीस्थळाची स्थापना केली आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अहमदपूरहून नांदेडच्या काब्दे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाले. आध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा तारा कायमचा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. सायंकाळी 5.30 वाजता नांदेडहून पोलीस बंदोबस्तात त्यांचे पार्थिव अहमदपूर येथील भक्तीस्थळाकडे रवाना करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!