महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांची बैठक बोलावली; राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या विषयावरून आता राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली, नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट झाली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांची भेट बोलावली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची भेट घेणार आहेत. या बैठकीत राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा चिघळलेला विषय, मनोज जरांगेंचे आंदोलन यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

ओबीसी नेत्यांना सुरक्षा पुरवणार
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी एक बैठक झाली. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये ओबीसी नेत्यांना धमक्या येत असल्यामुळे तात्काळ सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी करण्यात आली. समता परिषदेच्या बीडच्या कार्यकर्त्याचं हॉटेल जाळल्यानंतर भुजबळांनी गृहमंत्र्यांकडे ओबीसी नेत्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ओबीसी नेत्यांना तात्काळ सुरक्षा देण्याबाबत दोन्हीही नेत्यांना आश्वासन देण्यात आलं.

पोलीस महासंचालक रजनीश शेठ वर्षा बंगल्यावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली. त्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या अनुषंगाने चर्चा झाली. राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून त्या संदर्भात माहिती घेऊन निर्णय घेण्यासाठी बैठक झाल्याची माहिती आहे.

राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक
मराठा आंदोलनाबाबत सरकार गंभीर असल्याचा संदेश देत मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीच्या माध्यमातून मराठा आंदोलन, सद्य स्थिती आणि कायदा, सुव्यवस्था यांचा आढावा घेणार आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!