महाराष्ट्र

दाभोलकरांच्या हत्येचा पूल

मी एरंडवण्यात रहायचो आणि माझे मित्र शनिवारवाड्याच्या मागच्या बाजूला. आम्ही नुकतेच पासआउट झालो होतो. कोणालाच जॉब नव्हता.मी मुंबईचा जॉब सोडून चार महिन्यात परत आलो होतो.त्यामुळे घरी बिलकुल थांबायचो नाही.रोज शनिवार पेठेतल्या मित्रांच्या रूमवर पडीक असायचो.सगळे वॉकइन देऊन देऊन फ्रस्ट्रेट झालेले होते. आयुष्य म्हणजे काय वगैरे पावसाळी छत्र्यांसारख्या हंगामी विषयांचा तो काळ होता. मग ब्राऊनियन मोशन सारखे आम्ही एकमेकांना वेगवेगळ्या विषयांवर भिडायचो. वाद घालायचो. भांडणं करायचो. दुनियेची मापं काढायचो.रोज संध्याकाळी मोतीबागेत चहा पिऊन ओंकारेश्वरच्या पुलावर बसणे आणि जगाचे कसे कवाडे लागले आहेत याची भूक लागेपर्यंत चर्चा करणे हा आमचा नियमित नशेचा कार्यक्रम होता.एक दिवस सकाळी बातमी आली की दाभोलकरांचा खून झाला.एकदम सकाळी.मी रात्र जागून अजून झोपलोही नव्हतो.तारीख होती 20ऑगस्ट २०१३ खून ओंकारेश्वरच्या पुलावर झाला होता. मी तसाच तडक मित्रांच्या रूमवर गेलो. सकाळचे १० -११ वाजले असतील. मग आम्ही मित्र पुलावर गेलो. पोलीस, बघे, अंनिस चे कार्यकर्ते, असे लोक जमले होते. त्यांची त्यांची कामं करत होते. एक साईडची ट्राफिक बंद केलेली होती.पुलावर उजव्या बाजूला खडूनं आकृती काढली होती. Anatomy of the murder च्या क्रेडिट सिन ला Saul bass ने अशाच आकृत्यांचा खेळ मांडला आहे. तेव्हा ते किती सुंदर वाटलं होतं. आता ही प्रत्यक्षातली खडूची आकृती पाहताना फाटली होती.तेच आम्ही मित्रांनी दाभोलकरांचं घेतलेलं अंत्यदर्शन. आदल्या दिवशी संध्याकाळी त्याच जागेवर बसून आम्ही निर्गुण निराकार निराशेच्या पोटातून सब दुनिया झूठ है चे रडगाणे गात होतो. आज तिथेच जगातल्या खोट्या गोष्टींविरुद्ध आयुष्यभर लढणारा एक विवेकी माणूस मारला गेला होताआम्ही पुन्हा रूमवर परत आलो. फार काही या विषयावर नंतर बोलणं झालं नाही. पुढे सर्वांना नोकऱ्या लागल्या. सगळे आपापल्या मार्गी लागले. रूम बदलत राहिली. पार्टनर बदलत राहिले. रोजच्या आयुष्यात थोडाथोडा विवेक आणण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत राहिलासब झूठ है च्या बाता कमी झाल्या.आहे ते इथेच आहे.आशा,निराशा,प्रेम,संघर्ष सर्व काही याच स्थळकाळात आहे.हा खेळ जो चालुय यात कुंपणावर बसून चकाट्या पिटणारे आपल्याला व्हायचं नाही हे प्रत्येकाला कळायला लागलं.आम्ही अचानक प्रौढ झालो.पण ओंकारेश्वरच्या पुलावर गेलो ते त्या दिवशी शेवटचच.


लेखक अरविंद जोशी हे सोशल मीडियातील सक्रीय लेखक आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!