बीड

लग्नासाठी अँटिजेंन, आरटीपीसीआर बंधनकारक ! नवरा, नवरी अन् वर्‍हाडींना टेस्ट करावीच लागणार, अन्यथा गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकार्‍यांनी काढले आदेश


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. यापूढे लग्न समारंभ आयोजित करायचा असल्यास नवरा,नवरी यांच्यासह पन्नास वर्‍हाडी मंडळींची सुद्धा अँटिजेंन अथवा आरटिपीसीआर करावी लागेल अन्यथा जेलमध्ये बसावे लागेल.

बीड जिल्हा हा सध्या अनलॉकच्या तिसर्‍या टप्यात आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. लोक चार वाजेनंतर देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. 11 ते 23 जून दरम्यान आढावा घेतल्यानंतर प्रशासनाला आकडे कमी होत नसल्याचे जाणवले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ धूम धडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर प्रशासनाने नव्याने आदेश काढले आहेत. त्यानुसार यापुढे लग्न आयोजित करावयाचे असल्यास मंगल कार्यालय बुक केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातून परवानगी घ्यावी लागेल, ही परवानगी घेतल्यानंतर त्या त्या नगर पालिका, नगर पंचायत अथवा ग्रामपंचायतमध्ये अर्ज करावा लागेल. त्यानंतर वधू, वर आणि पन्नास वर्‍हाडींची अँटिजेंन अथवा आरटिपीसीआर करावी लागेल, ती निगेटिव्ह आल्यासच लग्न करता येईल. या सगळ्या गोष्टी ची काळजी घेतली आहे की नाही याबाबत खात्री त्या त्या यंत्रणेने करावी,परवानगी अथवा नियम पाळले जात नसल्यास थेट गुन्हे दाखल करावेत असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!