बीड

आज सव्वा दोन लाख बालकांना दक्ष आरोग्य यंत्रणा देणार पोलिओचे डोस ! जिल्ह्याला 3 लाख 66 हजार डोस प्राप्त, 2357 बुथवर 5971 आरोग्य कर्मचार्‍यांची डीएचओंनी केली नियुक्ती


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोनात गेले, या भयाणक संकटातही जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने चोख कर्तव्य बजावून जिल्हावासियांचे प्राण वाचवले, या संकटावर मात केल्यानंतर जिल्ह्याची दक्ष आरोग्य यंत्रणा आज दिवसभरात जिल्ह्यातील 2 लाख 14 हजार 88 बालकांना पोलिओचे डोस देणार आहे. याअनुषंगानेच जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे तब्बल 3 लाख 66 हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या लसीकरणात त्यांच्याच नेतृत्वात बीड जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळविला आहे. अगदी याच प्रमाणे आजचे पोलिओचे लसीकरणही यशस्वी होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.
े देशात पोलिओचे लसीकरण 1978 मध्ये सुरु करण्यात आले. 1984 पर्यंत 40 टक्के बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात यश मिळाले. जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्या नुसार राज्यात सन 1995 पासुन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये 5 वर्षा खालील बालकांना पोलिओ लसी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते, भारतामध्ये 13 जानेवारी 2011 नंतर आजपर्यंत एकही पोलिओ रुग्ण आढळुन आलेला नाही, व भारताला पोलिओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मार्च 2013 मध्ये मिळालेले आहे. सर्व बालकांना विहीत वयात प्राथमिक लसीकरण,नियमित एएफपी, सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतगर्त 0-5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे या तीन प्रमुख आधार स्तंभावर पोलिओ निर्मुलनाची यशस्वीता अवलंबुन आहे. भारताच्या शेजारील देश पाकिस्तान व अफगाणीस्तान या देशात अजुनही पोलिओचे रुग्ण आहेत. आफ्रीकेतील नायजेरीया या देशात नोव्हेंबर 2012 पासून एक ही रुग्ण आढळुन आलेला नाही. सन 2010 मध्ये मुंबई येथील सांडपाण्याच्या प्रयोगशालेय तपासणीमध्ये पोलिओ व्हायरस आढळुन आला. सन 2010 या वर्षात मालेगाव शहरात 4 व बीडमध्ये 1 असे 5 पोलिओचे रुग्ण महाराष्ट्रात आढळुन आले होते. बीड जिल्ह्यातील सदरील बालक धारुर तालुक्यातील स्थलांतरीत कुटुंबातील असुन मोहिमेच्या वेळी बालकाचे पालक हे साखर कारखान्यावर कामाला होते. सन 2021 या वर्षात आज दि. 31 जानेवारी 2021 या दिवशी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची फेरी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर मोहिम सर्वेक्षण करताना 227 जोखीमग्रस्त भाग आहेत. यामध्ये अतिदुर्गम भाग / डोंगराळ भागातील पाडे, वस्त्या, गावे, शहरी भागातील झोपडपट्टी, विटभट्ट्या / बांधकाम, स्थलांतरीत वस्त्या, ऊसतोडणी वस्त्या, इतर ( पेरीअर्बन एरीया, लसीकरणाचे काम कमी असणारे भाग, सलग तीन सत्रे रद्द झालेली गावे 9 परीचारीकाचे पद रिक्त असलेल्या उपकेंद्राची गावे इत्यादी ठिकाणी 100 लाभाथ्यार्ंच्या मागे एक बुथ या प्रमाणे बुथचे नियोजन करण्यात आलेले आहे. बीड जिल्ह्याची लोकसंख्या 2684889 असुन या मध्ये 0 ते 5 वयोगटातील अपेक्षीत लाभार्थी 214088 आहेत. 366000 डोसेस प्राप्त झालेले आहेत. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी 2357 बुथचे नियोजन करण्यात आले आहे. या बुथवर सेवा देण्यासाठी एकुण 5971 आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी मदतनीस, लिंकवर्कर, विद्यार्थी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मोहिमेवर देखरेख करण्यासाठी 497 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत, या सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. व गृहभेटीवर देखरेख ठेवण्यासाठी 502 पर्यवेक्षक नियक्त करण्यात आलेले आहेत. बीड जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्र 52 व जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय असे एकुण 15 शासकीय रुग्णालय आहेत. वाडड्या, वस्त्या , बांधकामचे ठिकाण, रस्ते, ऊसतोडणी कामगार, इत्यादी ठिकाणी 152 मोबाईल टीमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच रेल्वे स्थानक, बस स्टॅन्ड, इत्यादी ठिकाणी 109 ट्राझीट टिमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बीड जिल्हा हा ऊस तोड मजुरांचा जिल्हा असल्यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणवर आहे. बाहेर गावी गेलेल्या बालकांची यादी तयार करुन ते ज्या ठिकाणी गेलेले आहेत, त्या जिल्ह्याच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आले आहे. लसीकरण केंद्राचे काम सकाळी 8 वाजता सुरु होईल व संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत राहिल. 0 ते 5 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना घरोघरी जावुन याद्याप्रमाणे स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. तसेच सदर मोहिमेची प्रसिध्दी करण्यासाठी रेडिओ, टी.व्ही, तसेच रॅली काढण्यात येणार आहे व रॅलीच्या तसेच मोहिमेच्या उद्घाटनासाठी मान्यवर व्यक्तीना निमंत्रीत करण्यात आले आहे. एकाच वेळी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवल्यामुळे सर्व बालकांची प्रतिकार शक्ती वाढणार आहे. यामुळे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, सरकारी विभाग, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी तसेच जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!