गेवराई

वाळू माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले, स्वत:  गेवराईत रात्री उशीरापर्यंत होते तळ ठोकून

पथकावर हल्ला करणार्‍या गुंडांना तात्काळ गजाआड करण्याच्या दिल्या सुचना तर पाच पथके स्थापन करून हाती घेतली सर्च मोहिम


गेवराई, दि. 20 (लोकाशा न्यूज) : वाळू चोरी कोण करतयं, त्यासाठी आजूबाजूला उभी असलेली वाहने कशासाठी आलीत; या सगळ्या प्रकरणाची माहीती तलाठी-मंडळ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदारांना आहे का नाही, नसेल तर मग, तुम्हाला नेमक काय माहीत आहे, असा सवाल उपस्थित करून, अरे, वाळू तस्करी करणारे गुंड थेट मारायची हिमंत कशी काय करतात, तुम्हाला मारले, म्हणजेच मला मारल्या सारखे आहे. बघून-सवरून तो मी नव्हेच, ही हरामखोरी आहे. तुम्ही अपडेट रहा, तस्कारांचे कंबरडे मोडायला मी खंबीर असल्याचा इशारा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना दिल्याचे समजतेे. जिल्हाधिकारी स्वत: शुक्रवारी दुपारपासून रात्री उशीरापर्यंत गेवराई आणि तालुक्यात तळ ठोकून होते, तहसिलदारांच्या पथकावर हल्ला करणार्‍या गुंडांना तात्काळ गजाआड करण्याच्या सुचना त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचबरोबरच पाच पथके स्थापन करून गेवराई तालुक्यात सर्च मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत वाळूच्या साठ्यांबरोबरच वाळू वाहतूक करणार्‍या अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
यापुढे, गोदाकाठी वाळू साठा आढळून आल्यास तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांना जबाबदार धरून, कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम ही त्यांनी यावेळी बैठकीत बोलताना दिला आहे. दरम्यान, या आधीही तत्कालीन तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या गाडीला अवैध वाळू वाहतूक करणार्‍या हायवाने धडक देऊन, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. वाळू चोरी करणार्‍या तस्कर गुंडाची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. वाळुची चोरी करून अवैध वाहतूक करणार्‍या तस्कारांनी तहसीलदारांच्या महसूल पथकावर अचानक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली असून, या हल्ल्यात चार कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेची माहीती कळताच जिल्हाधिकारी रेखावार यांनी घटनास्थळी भेट देऊन, तहसील कार्यालयात त्यांनी तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी, मंडळअधिकार्‍यांची बैठक घेतली आहे. सदर हल्याने गोदाकाठी सेवेत असलेल्या महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ,तालुक्यातील बोरगाव बुद्रुक शिवारात चोरट्या पद्धतीने वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलच्या महसूल पथकाला मिळताच, सबंधित पथकाने तातडीने घटनास्थळावर जावून एका टिप्पर चालकास विचारपूस करताच, गाडीमध्ये आलेल्या काही गुंडानी पथकावर अचानक हल्ला केला. घटनेत चार कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अज्ञात वाळू तस्करां विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी घटनास्थळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार भेट दिली. या घटनेने एकदा खळबळ उडाली असून, कर्मचारी दहशतीखाली आलेत. चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगाव बुद्रुक शिवारातून अनाधिकृतपणे वाळुचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार खाडे यांना मिळाल्यावर , महसूल विभागाचे मंडल अधिकारी अमोल कुरुळकर, तलाठी राजकुमार धारूरकर, कोतवाल योगेश शहाणे, शिवशंकर आतकरे, दीपक राठोड यांनी घटनास्थळ गाठले. बोरगाव ते कुरणपिंप्री रस्त्यावर या पथकाला पांढर्‍या रंगाचा टिप्पर आढळून आला. या टिप्परला थांबवून त्यांनी चालकाशी विचारपूस करताच, अचानक पाठीमागून एक लाल रंगाची गाडी आली. ( क्र. एम.एच. 16 डी.झेड. 9701 ) गाडीतील गुंडानी पथकातील कर्मचार्‍यांना काठीने मारहाण केल्याने, संजय शंकर नेवडे (वय 41), योगेश सुरेश शहाणे (वय 24), शिवशंकर सुरेश आतकरे (वय 26) आणि दिपक आसाराम राठोड (वय 37) हे चारजण जखमी झाले. या प्रकरणी संजय नेवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीं विरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ,शुक्रवार ता. 20 रोजी बीड जिल्हाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयात दुपारी दोन वाजता तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार यांच्याशी तहसील पथकावर वाळू तस्कारांनी केलेल्या मारहाण प्रकरणावर बैठकीत चर्चा केली, बैठकीनंतर त्यांनी घटनास्थळाही भेट दिली, विशेष म्हणजे वाळू माफियांना सोडायचे नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा स्पष्ट सुचना यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. यावेळी तहसिलदार सचिन खाडे, नायब तहसिलदार सुहास हजारे, जाधव, शेजूळ यांच्यासह अन्य अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

माफियांनी पळविलेली बोट अखेर
राजाभाऊ कदमांच्या पथकाने ताब्यात घेतली

आष्टी : तालुक्यातील वाकी परिसरातील सिना नदीत अवैध वाळू उपसा करणारी बोट तहसिलदार राजाभाऊ कदम यांच्या पथकाने जाऊन ताब्यात घेऊन कारवाई करत असतांना वाळू उपसा करणार्‍यांनी अंधाराचा फायदा घेत ही बोट घेऊन नदि पाञात पळून गेले. पोलिस व महसूल पथकाने तब्बल पाच ते सहा तासाने ही बोट पकडून आज्ञात तीन व्यक्तीविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आष्टी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
            याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी गुरूवार दि.19 रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील वाकी येथील सिना पात्रातुन वाळु उपसा करणारी बोट महसूल विभागाने पकडली व  सायंकळी नदीकाठी लावून पंचनामा आणि ताबा पावती करत असताना  अंधराचा फायदा घेऊन चक्क पोलिस, महसूल पथकांच्या डोळ्यात धुळ टाकुन बोटच पळवली मग तब्बल पाच सहा तासाच्या शोधानंतर पात्रातुन ती बोट पुन्हा जप्त करण्यात आली. ही कारवाई तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार निलिमा थेऊरकर, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस,  मंडलधिकारी इंद्रकांत शेंदुरकर,मंडळधिकारी पांडूरंग माडेकर,तलाठी प्रविण बोरूडे,तलाठी नवनाथ औंदकर,तलाठी जगदीश राऊत,पो.कॉ.राजू भिसे,संतोष शिरसागर,बंडू दुधाळ यांनी केली. दरम्यान गुरूवारी रात्री उशीरा कडाचे प्रभारी मंडळधिकारी इंद्रकांत शेंदूरकर यांच्या फिर्यादीवरून आज्ञात तीन जणांविरूध्द कलम 379,353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलिस निरीक्षक सलीम चाऊस हे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!