बीड गेवराई

शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबर रोजी होणार; अमरसिंह पंडित यांची माहिती

गेवराई, दि.२०:- शैक्षणिक क्षेत्रात अतिशय मानाचा समजल्या जाणाऱ्या शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने होणार आहे. आदर्श शिक्षकांच्या निवडी संदर्भात निवड समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील गुणी गुरूजनांचा गौरव करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने शारदा प्रतिष्ठानने हा उपक्रम मागील १३ वर्षे सातत्याने सुरु ठेवला आहे. शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या ११ शिक्षकांचा गौरव प्रतिष्ठानकडून करण्यात येणार असल्याची माहिती शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
गेवराई विधानसभा मतदार संघातील गुणी गुरूजनांचा गौरव व्हावा, शैक्षणिक क्षेत्रात भरीव आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, समाजाने या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा सन्मान करावा या उद्देशाने शारदा प्रतिष्ठान या सामाजिक स्वयंसेवी संस्थेकडून मागील १३ वर्षे सातत्याने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे नेत्रदिपक आयोजन करण्यात येत आहे. या पुरस्कारामुळे शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धात्मक चांगले काम दिसू लागले आहे. या पुरस्काराला शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान असल्याचे सांगून शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, पुरस्कारासाठी निवड करताना तटस्थ निवड समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सात शिक्षक, एक विशेष शिक्षक, अल्पसंख्यांक उर्दु माध्यमाचे एक शिक्षक आणि खाजगी माध्यमिक विभागातील दोन शिक्षक अशा एकुण अकरा आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सपत्नीक गौरव केला जातो. यावर्षी शिक्षकदिनी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी दिली आहे.
शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ञ नारायणराव मोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण काळम पाटील, आदर्श शिक्षक तात्यासाहेब मेघारे, मुख्याध्यापक विजय डोंगरे, आदर्श शिक्षक विष्णू खेत्रे, समितीचे समन्वयक प्राचार्य डॉ.एस.डी.पटेल हे उपस्थित होते. शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमुळे गेवराई तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्पर्धात्मक बदल झालेले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!