महाराष्ट्र

अखेर नाथाभाऊंचा भाजपला रामराम, शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार

एकनाथ खडसेंनी भाजपचा त्याग केला असून शुक्रवारी दुपारी दोन वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

Eknath Khadse to join NCP on Friday afternoon, announces Jayant Patil

मुंबई : आज-उद्या करता करता अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.” यावेळी “एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला,” असंही ते म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, असंही पाटील यांनी नमूद केलं.

खूप लोक आमच्या पक्षात येणार असं मी म्हणणार नाही. परंतु ज्या नेत्यांना कार्यकर्त्यांचा, जनतेचा पाठिंबा आहे त्यांना नक्कीच आमच्या पक्षात यायचं आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!