महाराष्ट्र

मुख्यमंत्री शेतकऱ्यांना पावले,अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर

जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर मिळणार दहा हजार

राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

CM Uddhav Thackeray declares Rs.10,000 crore help to rain-hit farmers
https://secureframe.doubleclick.net/container.html?ecs=20201023

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

या दहा हजार कोटी रुपयांमध्ये शेती, घरांसाठी, रस्ते-पुलाचं बांधकाम, पाणी पुरवठा याचा समावेश आहे.

रस्ते- पूल – 2635 कोटी
नगर विकास – 300 कोटी
महावितरण ऊर्जा – 239 कोटी
जलसंपदा – 102 कोटी
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा – 1000 कोटी
कृषी-शेती-घरासाठी – 5500 कोटी

जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत
शेती पिकासाठी जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर, मृतांच्या वारसांना, मयत पशुधनासाठी घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.  नुकसानग्रस्तांकरता 10 हजार कोटी रुपयांची मदत नम्रपणे जाहीर करत आहोत, कृपाकरुन त्याचा स्वीकार करावा. दिवाळीआधी सगळ्यांपपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

केंद्राकडून 38 हजार कोटी रुपये येणं बाकी
तसंच एकूण 38 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंं. “केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसान भरपाईकरता 1065 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. किती दिवस झाले सर्वांना माहित आहे. केंद्र सरकारकडून राज्याचे हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. त्याची पत्रे, स्मरणपत्रे देण्यात आलेली आहेत. अतिवृष्टीनंतर केंद्र सरकारकडून पाहणीकरिता  पथक येते, 2 ते 3 वेळा केंद्रास आठवण केली आहे परंतु अद्याप पथक आलं नाही,” असं ठाकरे म्हणाले.

केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे पालक आहे, कोणताही दुजाभाव न करता त्यांनी मदत करावी. आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ते करतील असा विश्वास आहे. यासाठी गरज पडल्यास पंतप्रधानांची भेट घेण्यासही मी तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!