मुंबई

विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी-वार्‍यासह कोसळणार मुसळधार पाऊस


मुंबई, 16 सप्टेंबर : मुंबई, ठाणे-नवी मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या 24 तासांत मराठवड्यासह विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या-मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड, लातूर, बीडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी मनमाड, येवला, भागात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळे अनेक परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. येत्या 24 तासांत विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये ऊन आणि ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज आहे. आर्वी तालुक्यात शुक्रवारी संततधार झालेल्या पावसाने आर्वी- वर्धा मार्गावरील सावळापूर नजीकचा पुलच वाहून गेल्याने रहदारी थांबली होती. मुसळधार झालेल्या पावसामुळे परिसरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानं अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. नदीपलिकडच्या 5 गावांचा संपर्क तुटला आहे. उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यातही मंगळवारी मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!