CORONA मुंबई

मुंबईतील तिसरी लाट आटोक्यात; नवीन करोनाबाधितांपेक्षा बरे होणारी रुग्णसंख्या तिप्पट

मुंबई: करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. (Mumbai corona latest update) गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या कमी होत आहे. (Mumbai coronavirus) गेल्या २४ तासांत मुंबईत ७८९५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत नवीन करोनाबाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळजवळ तिप्पट आहे. त्यामुळे करोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्याचे चित्र सध्याच्या आकडेवारीवरून तरी दिसून येते.
डिसेंबर अखेर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह राज्यातील करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. या आठवड्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला आहे. आज, रविवारी मुंबईत ७८९५ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासांत नवीन करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास तिप्पट आहे. गेल्या २४ तासांत २१०२५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यांसह एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२०३८७ इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के झाला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या ६०,३७१ इतकी आहे. तर दुपटीचा दर हा ४८ दिवसांवर पोहोचला आहे. कोविड वाढीचा दर हा ९ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत १. ४० टक्के इतका आहे.गेल्या २४ तासांत अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्णांपैकी ९ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये सात पुरूष तर चार महिला आहेत. यातील १० रुग्णांचे वय हे साठ वर्षांवरील होते. तर एका रुग्णाचे वय हे ४० वर्षांखालील होते, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

रुग्णसंख्येत सातत्याने घट
१० जानेवारी – १३,६४८
११ जानेवारी – ११,६७४
१२ जानेवारी – १६,४२०
१३ जानेवारी – १३,७०२
१४ जानेवारी – ११,३१७
१५ जानेवारी – १०,६६१
१६ जानेवारी – ७८९५

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!