परळी

पूरग्रस्तांना मदत करून पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस होणार साजरा, परळी भाजपचा निर्णय ; सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक

परळी । दिनांक २५।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस राज्यातील विविध भागांतील पूरग्रस्तांना मदत करून साजरा करण्याचा निर्णय परळी भाजपने घेतला असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे व शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिली. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पंकजाताई मुंडे यांचा उद्या २६ जुलै रोजी वाढदिवस आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे आपल्या मनाला पटत नाही, त्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पंकजाताई मुंडे यांनी अगोदरच घेतला होता. वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले होते.

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, चिपळूण आदी भागात नुकत्याच झालेल्या महापुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. जिवित व मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशा संकटात लोकांना आज मदतीची गरज आहे, त्यामुळे वाढदिवस साजरा न करता त्याच्या विविध कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून जमा झालेला सर्व निधी पंकजाताई मुंडे यांचेकडे सुपूर्द करून पूरग्रस्तांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. याच अनुषंगाने शहरात मदतफेरी देखील काढण्यात येणार आहे असेही मुंडे व लोहिया यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!