बीड आष्टी

कड्यात तहसीलदार राजाभाऊ कदम यांची बेधडक कारवाई ; लाॅकडाऊनमध्ये दुकानदारी करणा-यांना दंड ठोकून दुकाने केली सील

कडा
एकीकडे कोरोनाचा जीवघेणा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासन जीव तोडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असतानाही लाॅकडाऊनच्या नियमावलीला हरताळ फासून सर्रास धंदा करणा-या कड्यातील दोन कापड व्यावसायिकांवर तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या पथकाने प्रत्येकी दोन हजाराचा दंड ठोठावून कारवाई केली. त्यामुळे शासन नियमांची पायमल्ली करणा-या दुकानदारांची चांगलीच पाचावर धारण बसली आहे.
आष्टी तालुक्यात सध्या शहरांसह ग्रामीण भागात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरश: थैमान घातले असून बाधितांची संख्या वाढत आहे. सध्या मोठमोठ्या दवाखान्यात रुग्णांसाठी बेड देखील शिल्लक दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागासह महसूल व पोलिस प्रशासन सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना व सर्वत्र जनजागृती करीत आहे. परंतू परिस्थितीचे गांभीर्य व सामाजिक दायित्व गुंडाळून काही धनदांडगे व्यावसायिक अनधिकृतपणे लाॅकडाऊनच्या कालावधीत आपली दुकाने उघडून जिल्हाधिका-यांच्या आदेशाला सर्रास हरताळ फासून धंदा करीत असल्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या पथकाला गुरुवारी कड्यात पेट्रोलिंग दरम्यान प्रत्यक्ष निदर्शनास आले. त्यामुळे तहसीलदार कदम यांनी येथीेल संतोष ड्रेसेस व कोहिनूर क्लाॅथ अँन्ड गौतम रेडीमेड नावाच्या कापड दुकानदारांना जागेवरच प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावून दुकानांना सील करण्याचे सुचित करुन यापुढे लाॅकडाऊनच्या कालावधीत दुकानदारी केल्यास बेधडक गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला केले आहेत. त्यामुळे शासन नियमावलीची पायमल्ली करणा-या धंदेवाईकांची चांगलीच पाचावर धारण बसली आहे. याप्रसंगी महसूल पथकात तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे, पीएसआय कोरडे, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, तलाठी नवनाथ औदकर, मोहन पाचांगे यांच्यासह महसूल व ग्रामपंचायत कर्मचा-यांचा सहभाग घेतला होता.

मुजोर सुपूत्राची पत्रकारांनाच अरेरावी
लाॅकडाऊनच्या कालावधीत तहसीलदार राजाभाऊ कदम पथकासह पेट्रोलिंग करीत असताना काही दुकानदार लाॅकडाऊनमध्ये धंदा करताना आढळले. त्यामुळे पथकाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यावेळी स्थानिक प्रशासन व पत्रकारांनी घटनास्थळी फोटो का काढले. म्हणून त्यांच्या नावाने खडे फोडून दुकानदाराच्या मुजोर सुपुत्राने पत्रकारांनाच नाहक अरेरावी केली. त्यामुळे त्या दुकानदारावर कारवाईची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!