देश विदेश राजकारण

“…अन्यथा आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरणार,” शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची दिली हाक

नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे. यादरम्यान भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने जर आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही मोठी ट्रॅक्टर रॅली काढू असं ते म्हणाले आहेत.

“आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचं ऐकलं नाही तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही प्रवास करु. येथील आंदोलनदेखील सुरु राहणार. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही,” असं राकेश टिकैत यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे. झारखंडचे कृषीमंत्री बादल पारेख यांनी गाझीपूर सीमेवर भेट घेतल्यानंतर राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारतीय किसान युनिअनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचं राकेश टिकैत यांनी जाहीर केलेलं आहे. ‘जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही’ असा नारा राकेश टिकैत यांनी दिलेला आहे. यावेळीच त्यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही असं मोठं विधान केलं होतं.

६ फेब्रुवारीला चक्का जाम आंदोलन
६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी घोषणा केली आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत राज्य तसंच राष्ट्रीय महामार्ग रोखले जाणार आहेत. दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याबद्दल तसंच इतर मुद्द्यांवरुन हे आंदोलन केलं जाणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!