खान्देश

फडणवीसांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट करण्याची धमकी, महाजनांकडे मागितली होती 1 कोटींची खंडणी


जामनेर, दि. 14 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये भाजपचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्लोबल हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडला. पण, या कार्यक्रमाच्या सभास्थळी बॉम्ब ठेवल्याची धमकी देऊन 1 कोटींची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे मंगळवारी ग्लोबल महाराष्ट्रा मल्टीपर्पज हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार, आमदार आणि अनेक पदाधिकारी हजर होते. मात्र, हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना कॉल व मेसेजचा माध्यमातून धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. बीओटी कॉम्प्लेक्समध्ये उद्घाटन कार्यक्रमाची तयारी सुरू असताना गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना मोबाईलवर दुपारी 2 वाजता धमकीचा फोन आला होता. तर दुपारी 03.18 वाजेच्या सुमारास पुन्हा दीपक तायडे यांना धमकीचा आणखी एक मेसेज आला होता. पाच बजे तक एक करोड भेज दे, महाजन को बोल दे, नही तो बहोत बडा धमाका हो जाएगा. मालेगाव में मेरे आदमी खडे हैं नही तो तुम्हारी मर्जी असा मजकूर असलेला मेसेज पाठवण्यात आला होता. पण, या धमकीला न घाबरता उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम संपल्यानंतर गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांनी जामनेर पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे. बॉम्ब ठेवण्याची धमकी कुणी दिली असावी, या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

error: Content is protected !!