खान्देश

फडणवीस रात्री दीड वाजता हॅकरला का भेटले?

एकनाथ खडसे लिहणार ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक


जळगाव, दि. 6 : मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणार्‍या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली? मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढविला आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ’नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी बोलताना खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. ’मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला आहे. सन 2009 ते 2014 या काळात राज्यात भाजपचे सरकार यावे यासाठी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, नितिन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गिरीष बापट, विनोद तावडे यांनी जिद्दीने सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे वातावरण तयार होवून भाजपाचे स्वबळावर सरकार आले. साधारण अपेक्षा अशी असते की, जो विरोधीपक्ष नेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळालं. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचलं गेलं. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता’, असा दावा खडसे यांनी केला.

भंगाळे-फडणवीस भेटीचे फोटो माझ्याकडे आले होते
माझे दाऊदच्या बायकोबरोबर बोलणे होत असल्याचा आरोप हॅकर मनिष भंगाळे याने केला. देशभर हे प्रकरण गाजत असताना त्याच दिवशी हा मनिष भंगाळे मध्यरात्री दीड वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला. त्याच्यासोबत कृपाशंकर सिंह देखील होते. त्याचवेळी त्यांच्या भेटीचे फोटोग्राफ माझ्याकडे आले होते. देवेंद्र फडणवीसांनी रात्री दीड वाजता मनिष भंगाळे याला भेटण्याचे कारण काय? असा सवाल देखील खडसे यांनी केला आहे. तेथून मनात शंका आली. त्यानतंर पुन्हा माझ्या जावयाने लिमोझिन घेतली, मी एआयडीसीची जमीन विकत घेतली, असे आरोप करण्यात आले. जमीन खरेदीची झोटिंग समितीकडून चौकशी करण्यात आली. त्या अहवालात देखील काही तथ्य नव्हते, असे नमूद करत खडसे यांनी फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

मंत्र्याच्या पीए व एका महीलेची क्लीप
माझ्यावर आरोपांचे हे षडयंत्र होते. हे षडयंत्र कुणी केले? कसे केले? त्यात कोण होते? कोणत्या मंत्र्याचे पीए होते? कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिप देखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखविणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखविल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. तसेच एका मंत्र्याच्या पीए व एका महिलेचे नग्न फोटो देखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना देवून या मंत्र्याचे व त्याच्या जवळच्या लोकांचे काय उद्योग आहेत, त्याचीही माहीती वरिष्ठांना दिल्याचे खडसे म्हणाले. मी काय गुन्हा केला आहे? असे वारंवार विचारतो आहे, असे सांगताना मी दोषी असेन तर मला शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणी मीच विधानसभेत केल्याची आठवणही खडसे यांनी यावेळी करून दिली.

error: Content is protected !!