खान्देश

धुळे आणि नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी, महाविकास आघाडीला पहिला धक्का

धुळे : धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपच्या अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अमरीश पटेल यांना 332 तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत. धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या पोटनिवडणुकीत 434 पैकी 4 मतं बाद झाली तर 430 मतं वैध ठरली. 216 प्रथम प्राधान्याची मतं घेणारा उमेदवार जिंकणार असं गणित होतं. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी 332 मतं घेत पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली. अमरिश पटेल यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबरला राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यानं केवळ 12 महिन्यांचा कालावधी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा या निवडणुकीत भाजपला फायदा होणार कि महाविकास आघाडी सरकारला फायदा होणार याकडं लक्ष लागून होतं. मात्र भाजपमध्ये गेलेल्या अमरीश पटेल यांनी त्यांचा गड राखला आहे.
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. मात्र खडसेंना महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यात यश आलं नाही. धुळे-नंदुरबार विधान परिषद हा एकच मतदार संघ आहे. काँग्रेसला अलविदा म्हणत भाजपमध्ये आलेल्या अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करणार्‍या सदस्यांची संख्या 437 होती. धुळे-नंदुरबार विधान परिषद मतदार संघात भाजपचे 199, काँग्रेसचे 157, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेनेचे 20, एमआयएमचे 9, समाजवादी पक्षाचे 7, बसपा , मनसेचा प्रत्येकी एक, अपक्ष दहा सदस्य मतदार होते. 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

error: Content is protected !!