बीड

परळी, माजलगावसह बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पा संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय

माजलगाव उजव्या कालव्यावरील वितरण व्यवस्थेचा प्रस्ताव सादर करण्याचे जयंत पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि. 9 (लोकाशा न्यूज) : परळी, माजलगाव सह बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाबाबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकीत अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
माजलगाव धरणातून निघणाऱ्या माजलगाव कालव्यातील वितरण व्यवस्था व उर्वरित कामांचे अस्तरीकरण ही कामे तात्काळ सुरू करावेत; परळी व अंबाजोगाई तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पाची उंची वाढवणे व गाळ काढणे तसेच परळीतील वाण धरणात अतिरिक्त पाणी साठा निर्माण करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. माजलगाव कालव्याच्या या दुरुस्ती मुळे आणखी २६ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, ही कामे नाविण्यापूर्ण पद्धतीने करण्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश ना. जयंत पाटील यांनी दिले
जायकवाडी प्रकल्पातील माजलगाव उजवा कालवा याचे पाणी वितरण करण्यासह पाण्याचे व्यवस्थापन करणे बाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रस्ताव सादर करण्याचे जलसंपदा विभागास निर्देश दिले आहेत. परळीची जलसंजीवनी असणाऱ्या वाण धरणास जायकवाडी प्रकल्पाचे पाणी परळीत आणण्यासाठी व पाणी आरक्षित करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करणेबाबत ना. जयंत पाटील यांनी विभागास निर्देश दिले आहेत.
या बैठकीस ना. जयंत पाटील, ना. धनंजय मुंडे यांच्यासह आ. प्रकाशदादा सोळंके, आ. प्रकाश वरपूडकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता आदी उपस्थित होते. ना. मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासह अन्य प्रश्नी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे लक्ष वेधले. परळी अंबाजोगाई तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील गाळ काढून त्या प्रकल्पांना पुन्हा नव्याने शक्ती प्रदान करणेबाबत तसेच त्या प्रकल्पांची क्षमता वाढवणे बाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रस्ताव मागवण्याचे आदेश दिले. स्व. पंडित अण्णा मुंडे उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून याअंतर्गत परळीसह २४ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना आखणे बाबतीतही तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी यावेळी विभागाला दिले आहेत.
शिरूर कासार तालुक्यातील सिंदफना धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून त्याच्या सांडव्याची उंची वाढवने गरजेचे आहे, तसेच सिंदफना धरणाच्या सुधारित मान्यतेनुसार मदमापुरी ता. शिरूर, झापेवाडी ता. शिरूर, वाघाचा वाडा ता. शिरूर, कपिलधारवाडी ता. बीड या चार साठवण तलावांना मान्यता देण्याबाबत ना. धनंजय मुंडे यांनी मागणी केली. यावेळी या चारही प्रकल्पांबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ना. जयंत पाटील यांनी विभागाला दिल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!