आष्टी

ऊसतोड कामगारांना फक्त पंकजाताईच न्याय मिळवून देऊ शकतात, ताईंच्या नेतृत्वाखाली आष्टीत कामगारांची राज्यस्तरीय बैठक घेणार – मा.आ.भीमराव धोंडे

कडा :- ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतुकदार यांच्या दर वाढीचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी माजी मंत्री व लवादाच्या प्रमुख पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ऊसतोड कामगारांची राज्यस्तरीय बैठक आष्टी येथे घेणार, तसेच ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतुकदार यांना वाढ मिळण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी संघटीत रहावे म्हणजे निश्चित वाढ मिळेल असे मा.आ.भीमराव धोंडे यांनी कडा येथील गंगाई फार्मसी महाविद्यालयात आयोजित ऊसतोड कामगार मुकादम संघटनेच्या बैठकीत बोलताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार केशवराव आंधळे, जेष्ठ नेते बबनराव झांबरे, लालाभाऊ कुमकर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिकराव निकाळजे, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, मुकादम संघटनेचे जेष्ठ नेते बाबासाहेब बांगर, तालुकाध्यक्ष हनुमंत थोरवे, भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष बबनराव औटे, जि.प.सदस्य सुरेश माळी, पं.स.सदस्य रावसाहेब लोखंडे, बाबासाहेब गर्जे, सरपंच पांडुरंग नागरगोजे व इतरांची उपस्थिती होती.
प्रारंभी लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना हाॅलमध्ये प्रवेश करण्यापुर्वी सॅनेटाईज करण्यात आले तसेच मास्क वाटप करुन हाॅलमध्ये सामाजिक अंतर ठेवत बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
पुढे बोलताना मा.आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी एकदम सुरुवातीला ऊसतोड कामगारांची संघटना स्थापन करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या निधनानंतर आज माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी ही परंपरा चालवली आहे. सध्या त्या लवादाच्या प्रमुख म्हणून काम पहात आहेत. माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मला सांगितले की, ऊसतोड मजुरांना न्याय देण्यासाठी आष्टी मतदारसंघातील तीनही तालुक्यात ऊसतोड मजूर मुकादमांच्या बैठका घ्याव्यात. मतदारसंघातील प्रत्येक गावात ऊसतोड मजूरांची संख्या भरपूर आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरापेक्षा ऊसतोड कामगारांना कमी पैसे मिळतात. आता ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतुकदार यांना शंभर ते दिडशे टक्के वाढ मिळाली पाहिजे तसेच त्यांच्या मुलांसाठी कायमस्वरूपी निवासी शाळा सुरू कराव्यात. मजुर कारखान्यावर गेल्यानंतर कडा, आष्टी, जामखेडची बाजारपेठेत ओस पडते एवढ्या मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे. शासनाने मजुरांच्या दरवाढीचा कायदा करावा म्हणजे त्यांना स्थैर्य लाभेल. खाजगी कंपनीत कामगारांना किती वेतन असावे यासाठी कायदा आहे त्याप्रमाणे ऊसतोड मजुरांसाठी कायदा करावा. कामगारांच्या न्याय मागण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी बीड येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करावी किंवा आष्टी येथे तुमच्या नेतृत्वाखाली आयोजित करु असेही मा.आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले. सध्या सर्वत्र कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ज्या कारखान्यावर ऊसतोड मजूर काम करीत असतील त्या कारखान्याने एखांद्या कामगारांना कोरोना झाला तर त्याच्या उपचाराची सोय तातडीने करण्याची व्यवस्था करावी. या भागातील स्थलांतर कमी करण्यासाठी आष्टी तालुक्याला उजनीचे आणि पाटोदा व शिरूरसाठी गोदावरीचे पाणी आणणे आवश्यक आहे. भविष्यात या दोन्ही साठी संघर्ष करु असेही मा.आ.भीमराव धोंडे यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार केशवराव आंधळे यांनी सांगितले की, समाधानकारक वाढ मिळण्यासाठी कामगारांनी सर्वशक्तीनिशी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. ऊसतोड मजुरांचे आष्टी मतदारसंघाचे नेतृत्व मा.आ.भीमराव धोंडे हे करीत आहेत. पंकजाताई मुंडे यांचा आदेश येईपर्यंत कामगारांनी कोयता मॅन करावा. ऊसतोड मजुरांना आरोग्य सेवा मोफत मिळावी, सध्या कामगार झोपड्यात राहतात त्याऐवजी कारखान्याजवळ चांगली घरे मिळावीत. प्रत्येक कामगारांचा विमा हप्ता कारखान्याने भरावा व एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्यांचा वारसदारांना ५ लाख रुपये, जखमी झाला तर २ लाख आणि बैलांचा मृत्यू झाला तर २ लाख रुपये मिळावेत. अनेक मुकादम कर्जबाजारी होऊन काम करतात त्यांना भरघोस वाढ मिळाली पाहिजे तसेच प्रत्येक कामगाराची नोंद करुन त्याला शासनाचे ओळखपत्र मिळावे व इतर मागण्यांची माहिती माजी आमदार केशवराव आंधळे दिली. यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, सरपंच सावता ससाणे, गोरक्ष तावरे, संदीप नागरगोजे, शांतीलाल रेपाटे, आप्पासाहेब पवार, बाबासाहेब आंधळे, संजय धायगुडे, कैलास शिंदे, बाळासाहेब शेकडे, कोकरे, राजु शेकडे, घनश्याम नरवडे, शहादेव कोंडे, दिनकरनाथा आंधळे,आश्रुबा आंधळे, नाशिरभाई शेख, सोपानराव थेटे, चेअरमन दादासाहेब हजारे, अशोक गिते, आण्णासाहेब लांबडे, दादासाहेब जगताप, ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब देशमुख, छगन कर्डीले, सचिन शिंदे, बंटी गायकवाड, आजिनाथ बेल्हेकर, विठ्ठल लांडगे, युवराज वायभासे, आबासाहेब तावरे व इतर उपस्थित होते. याप्रसंगी मुकादम संघटनेचे जेष्ठ अध्यक्ष बाबासाहेब बांगर, पं.स.सदस्य बाबासाहेब गर्जे यांची भाषणे झाली. सुत्रसंचलन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव शंकरराव देशमुख यांनी केले. याप्रसंगी आष्टी तालुक्यातील मुकादम मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!