बीड

एसपींचा आणखी एका गुंडाला दणका

गंभीर गुन्हे करणार्‍या आष्टीच्या ‘त्या’ गुंडाची एमपीडीए कायद्याअंतर्गत हर्सूल कारागृहात केली रवानगीबीड : गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून ठिकठिकाणी दादागिरी करणार्‍या गुंडांना एसपी हर्ष पोद्दार कारवाई करत आहेत. मागच्या आठ दिवसांपुर्वीच त्यांनी एका वाळू माफियाची हर्सूलच्या कारागृहात रवानगी केली होती. तर बुधवारी आणखी एका गुंडाला मोठा दणका देत त्यांची हर्सूलच्या कारागृहात रवानगी केली आहे. यामुळे गुंडगिरी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील गुंडगिरीचे व वाळू माफियांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एमपीडीए कायद्याअंतर्गत बर्‍याच गुन्हेगारांवर व गुंडांवर कारवाई करण्याचे योजिले आहे. त्याअनुषंगानेच त्यांनी दिलेल्या आदेशावरून आष्टीचे पोलिस निरीक्षकांनी 22 ऑगस्ट रोजी अशोक किसन जाधव (वय 30 रा. सुंदरनगर कडा ता.आष्टी) यांच्याविरूध्द एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांना सादर केला होता. सदर स्थानबध्द इसमाविरूध्द पोलिस ठाणे अंभोरा, आष्टी, जामखेड, नगर तालुक्यात खून, खूनाचा प्रयत्न, दंडाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दंगा करणे, खंडणी मागणे, खुनाचा कट रचने या व अशा स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे आष्टी ठाण्यात दाखल असून एक गुन्हा अंभोरा पोलिस स्टेशन, एक नगर पोलिस ठाण्यात तर एक जामखेड ठण्यात दाखल आहे. सदरील इसम हा आष्टी तालुक्यात दादागिरी करून सर्व सामान्य नागरिकांना त्रास दायक झाला होता. त्यामुळे पोलिसांची त्याच्यावर करडी नजर होती. सदर इसम अशोक किसन जाधव याच्यावर सीआरपीसी कलम 110, 107 व मपोका कलम 56 (1) प्रमाणे दि. 3 एप्रिल 2019 अन्वये कारवाई केली होती. परंतू सदर इसम त्या कारवाईस न जुमानता गुन्हे करण्याचे चालूच ठेवून होता. त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन करून बीड जिल्हा प्रवेशबंदी असतानाही बीड जिल्ह्यात येवून गुन्हे केले आहेत.
सदर प्रकरणात जिल्हादंडाधिकारी राहूल रेखावार यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सूल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध्द करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना आष्टी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचार्‍यांना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्री.बडे यांनी दोन पथके तयार करून सदर इसमाचा हद्दीत शोध घेण्यासाठी अहोरात्र जंग जंग पछाडले व गोपनीय खबर्‍याच्या आधारे माहिती काढून अत्यंत शिताफीन सदर इसमास 26 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कडा येथे ताब्यात घेवून पोलिस ठाणे आष्टी येथे पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले. त्यानंतर श्री.बडे यांनी पोलिस बंदोबस्तात त्याला औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात स्थानबध्द केले.भविष्यातही गुंडगिरी करणार्‍या व कायद्याला न जुमानणार्‍या व्यक्तीविरूध्द एमपीडीए कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, डीवायएसपी विजय लगारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे, सपोनि एस.बी.पठाण, अभिमन्यू औताडे, गर्जे, भिसे, गायकवाड, दुधाळ, करंजकर यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!