बीड

शहरातील दुकाने टप्प्या टप्प्यानेच उघडणार, प्रशासनाला सहकार्य करा – आ. संदिप क्षीरसागर

व्यापारी बांधवांच्या अडचणी समजून घेत जिल्हाधिकार्‍यांशी साधला संवाद


बीड : आ. संदीप क्षीरसागरांच्या उपस्थितीत शहरातील विविध व्यवसायिकांसह व्यापार्‍यांची बैठक झाली. सदरच्या बैठकीत व्यापार्‍यांनी आपले व्यवसाय सुरू करण्याबाबत आ. क्षीरसागरांकडे गर्‍हाणेे मांडले असता आ. क्षीरसागरांनी व्यापार्‍यांच्या सर्व अडीअडचणी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या कानी घालून व्यापार्‍यांचा प्रश्‍न सोडवण्याबाबत चर्चा केली असता वेगवेगळे व्यवसाय टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील, असे जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले. प्रशासन जनतेच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी हे सर्व करत आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करत शहरातील व्यापार टप्प्याटप्प्याने उघडावेत आणि प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले.

21 ऑगस्टच्या रात्री बारापर्यंत असलेल्या लॉकडाऊनची मुदत रात्री संपली. प्रशासनाकडून पुढील आदेशही देण्यात आले नाहीत, त्यामुळे शहरातील व्यापारी द्विधा मन:स्थितीत होते. सणासुदीच्या काळात उद्योग-व्यवसाय सुरू व्हावेत याबाबत व्यापार्‍यांनी आ. संदीप क्षीरसागर यांची भेट घेतली. क्षीरसागरांच्या उपस्थितीत व्यापार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत व्यापार्‍यांनी आपले प्रश्‍न क्षीरसागरांसमोर मांडले. त्या वेळी संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या सोबत चर्चा केली. सध्याची स्थिती ही कोरोना प्रादुर्भाव वाढवत आहे, त्याला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची परिकाष्ठा करत असून जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येऊ पाहत आहे त्यामुळे येणार्‍या 31 ऑगस्टपर्यंत शहरातील सर्व उद्योग धंदे टप्प्या टप्प्याने चालू करण्यात येणार आहेत. आजपयर्ंत शासन-प्रशासन व्यवस्थेला व्यापार्‍यांनी सहकार्य केले तसेच यापुढेही ते करण्यात यावे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. क्षीरसागर-रेखावार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आ. संदीप क्षीरसागरांनी व्यापार्‍यांनी शहरातील दुकाने टप्प्या टप्प्याने उघडण्यात येणार असल्याचे सांगून प्रशासन आपल्या सर्वांसाठीच आजच्या परिस्थितीत काम करत आहे. प्रशासनाला आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!