बीड

मराठा आरक्षणासाठी स्वत:ला संपविले, बीडमध्ये गळफास घेवून एकाची आत्महत्या


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बीडमध्ये शनिवारी रात्री एकाने गळफास घेत आत्महत्या केली. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे (44) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच काळकुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना नागरिकांनी झाडावरून उतरवले होते त्यानंतर 24 तासांतच काळकुटे यांनी राहत्या घरी गळफास घेतला. बीड तालुक्यातील ससेवाडी येथील मुळ रहिवासी असलेले जगन्नाथ पांडुरंग काळकुटे हे रिक्षा चालक आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने ते बीड शहरातील गोविंद नगर भागात वास्तव्यास होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी होत असलेल्या आंदोलनात ते कायम सहभागी होत होते. आंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेतही ते सहभागी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री 8 वाजता काळकुटे हे आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढले होते. आरक्षणासाठी झाडावरून उडी टाकून आत्महत्या करु असे त्यांनी म्हटले होते. मात्र,उपस्थित नागरिकांनी त्यांची समजूत काढून त्यांना झाडावरून खाली उतरवले होते. शनिवारी काळकुटे यांच्या पत्नी अर्चना या गावी शेती कामासाठी गेल्या होत्या. मुले बाहेर होती. सायंकाळी 7 वाजता अर्चना घरी आल्या असता. जगन्नाथ काळकुटे यांनी घरात भगव्या गमजाने छताला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत काळकुटे यांच्या पश्चात आई, पत्नी अर्चना, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
घटेनची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!