बीड अंबाजोगाई

अंबाजोगाईत चोरट्यांनी चक्क सहाय्यक पोलीस निरिक्षकाचेच घर फोडले!

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल लंपास

अंबाजोगाई – पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून गुन्हेगारी प्रचंड वाढल्याने सामान्य जनता सुरक्षित नसल्याचे आरोप जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी दोन दिवसापूर्वीच विधानसभेत केले होते. या आरोपांत तथ्य असल्याची प्रचीती लागलीच आली असून सामान्य जनताच नव्हे तर पोलीसही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. अंबाजोगाईत चोरट्यांनी सहा. पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांचे घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षितता आणि वाढलेल्या चोऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एपीआय रवींद्र शिंदे हे सध्या अंबाजोगाई अपर अधीक्षक कार्यालयात वाचक पदावर आहेत. ते अंबाजोगाईतील पोखरी रोडवरील पिताजी सारडा नगरीत राहतात. त्यांची पत्नी कोमल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ मार्च रोजी सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून बीडला गेले होते. ७ मार्च रोजी रात्री ११ वाजता ते घरी परतले असता त्यांना घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यानंतर घरात जाऊन पहिले असता चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त टाकून कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले मिनी गंठन, नेकलेस, झुंबर, टॉप्स असे १० तोळे सोन्याचे दागिने आणि तीन घड्याळे असा एकूण १ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. सदर फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय ज्ञानेश्वर गव्हाणे करत आहेत.

ठसे तज्ञ, श्वानपथकाने केली तपासणी
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करून तपास करण्यात आला. परंतु, चोरीच्या घटनेला ४८ तासांपेक्षाही अधिक काळ लोटल्याने या तपासातून फार काही निष्पन्न झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मागील काही महिन्यात अंबाजोगाई परिसरात चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. द्चाकींची वाहनचोरी तर नित्याची बाब आहे. घरफोड्या, बॅगा पळवण्याच्या घटनांनी नागरिक, व्यापारी दहशतीखाली आहेत. मागील महिन्यात एका व्यापाऱ्याचे दहा लाखांचे दागिने चोरट्यांनी पळवले, त्याचाही शोध अद्याप लागलेला नाही. या सर्व घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले झाले असून नागरिकांना पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!