परळी

सद्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असं काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं : पुरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पंकजाताई रस्त्यावर उतरल्या

बीड : भाजप नेत्या पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी परळी (Parali) इथं पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. कोकणात महापुरामुळे हाहाकार माजला आहे. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. सरकारकडून मदत मिळतेच आहे तरीही आपली मदत तिथपर्यंत पोहचविणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण मदत फेरी काढत असल्याचं पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं.
यावेळी पंकजाताई मुंडे यांना सध्या सोशल मीडियावर पंकजाताई मुंडेंचं शिवसेनेत स्वागत अशा पोस्ट फिरत असल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर पंकजाताई मुंडे म्हणाल्या, आता हा विषय नाही. सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे. आता सगळं शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असं काही नाही, आता महाराष्ट्रावर आलेलं संकट आणि त्यासाठी समर्पण हे महत्त्वाचं आहे”.

प्रत्येक संकटात मदत

आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. पण व्यक्तीचा सोहळा मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी सूचवलं मदत फेरी करुन पूरग्रस्तांना मदत करुया. माझ्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी परळीची आहे, परळीची कार्यकर्ती आहे, त्यामुळे इथे मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर ते फायद्याचं आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा, तिथे मदत पोहोचावी, असं पंकजाताई मुंडेंनी सांगितलं.

परिस्थिती खूप कठीण आहे, बिकट आहे. काही गावं मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. त्यांना उभं करावं लागेल. अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मी सध्या तरी त्याठिकाणी जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षी मी माझी मदत तिकडे पाठवेन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे, असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!