गेवराई

पीक कर्ज वाटपात बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी हेटाळणी खपवून घेणार नाही,विजयसिंह पंडित यांचा इशारा, तालुक्यातील बँकांना दिल्या भेटी

गेवराई, दि.२९ (प्रतिनिधी) ः- पिक कर्ज वाटपात बॅँकांकडून शेतकर्यांना मिळणारी अपमानजनक वागणुक, दलालांचा सुळसुळाट, शेतकर्यांची हेटाळणी आदी तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी थेट बँकांमध्ये जावून बँक अधिकार्यांना या बाबत धारेवर धरून जाब विचारला. यापुढे शेतकर्यांची हेटाळणी खपवून घेणार नाही असा सज्जड दम देताना प्रत्येक बँकेने पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी विजयसिंह पंडित यांनी बँक अधिकार्यांना दिल्या. त्यांच्या बँक भेटीमुळे शेकडो शेतकर्यांची कर्ज प्रकरणे मार्गी लागली असून मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगामासाठी बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना सोळाशे कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले, काही बँकांनी उद्दिष्टपूर्तीसाठी कोणतेही काम केल्याचे दिसून येत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सुध्दा आढावा बैठकीत या बाबत कडक निर्देश दिले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने केवळ २२.७४ टक्के कर्ज वाटप केले आहे, गेवराई तालुक्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ६९.६२ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना त्यांनी केवळ ११.८६ कोटी रुपयांचे आजपर्यंत कर्ज वाटप केले आहे. बँक अधिकार्यांची मुजोरी, मनमानी कारभार, उर्मट वागणुक आणि दलालांच्या सुळसुळाटाबाबत अनेक तक्रारी येत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी थेट बँकेच्या तलवाडा आणि जातेगाव येथील शाखांना भेटी दिल्या यावेळी या भागातील शेकडो शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील अत्यल्प उद्दिष्ट असलेल्या दोन्ही शाखांना भेटी दिल्यानंतर शाखाधिकार्यांना या बाबत विजयसिंह पंडित यांनी जाब विचारला, शेतकर्यांनी कर्जमागणीचे प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना वेळेत मंजुरी काम मिळाली नाही यांसह शेतकर्यांचा अपमान आपण खपवून घेणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अगोदरच कोरोनाच्या संक्रमण काळात शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना वेळेवर पिक कर्जाची रक्कम मिळाली नाही तर शेतकर्यांमधील असंतोष बाहेर पडेल आणि त्याला सर्वस्वी बँक प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देवून दाखल झालेले सर्व कर्ज प्रकरणे तात्काळ मंजुर करण्याची आग्रही भुमिका त्यांनी घेतली. बँकेचे मुख्य प्रबंधक प्रभावती यांच्याशी त्यांनी दुरध्वनीवरून संपर्क केला. शेतकर्यांना वेळेवर पतपुरवठा करण्यासाठी आवश्यक कर्मचारी तात्काळ नियुक्त करून इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची  मागणी विजयसिंह पंडित यांनी यावेळी केली. विजयसिंह पंडित यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बँक अधिकारी भानावर आले. त्यांच्या या दौर्यामुळे या भागातील शेकडो शेतकर्यांचे पिक कर्ज प्रकरणे मार्गी लागले असून शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!