गेवराई दि. 29( प्रतिनिधी ) माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील पहिले महिला कोविड केअर सेंटर गेवराई शहरातील र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात सुरू करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये केवळ महिला रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत.
बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी तालुका पातळीवर कोविड रुग्णांना उपचार आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केलेले आहेत. यापूर्वी गढी येथे 200 खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर सुरु करून तेथे 20 ऑक्सिजन बेड रुग्णांना उपलब्ध करून दिलेले आहेत. गेवराई शहरातील र. भ.अट्टल महाविद्यालयाच्या मुलींचे वसतीगृह त्यांनी कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देताना या वसतीगृहात केवळ महिलांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ असलेल्या या वसतीगृहात 70 सुसज्ज बेड महिलांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. या ठिकाणी संडास बाथरूम सुविधा असलेल्या एकाच खोलीमध्ये केवळ तीन बेडसह इतर सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अतिशय प्रशस्त वातावरणातील इमारत केवळ महिला रुग्णांना उपलब्ध झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण यांनीही याकामी पुढाकार घेऊन ही इमारत प्रशासनाला उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे. बर्याच वेळेला कोरोनाग्रस्त महिला रुग्णांची कुचंबना होते. अनेक वेळा महिला आरोग्य सुविधा घेण्यासाठी पुरुषासोबत एकत्र राहण्याची वेळ तसेच बाहेर राहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी महिला आपला आजार अंगावर काढतात आणि परिणामी त्यांना अनेक गंभीर आजारांची लागण होते. याचा विचार करुन महिलांना गेवराई शहरात 70 खाटांचे कोविड केअर सेंटर उपलब्ध झाल्यामुळे आता अडचण भासणार नाही. ज्या महिलांना लक्षणे दिसून येत आहेत त्यांनी तात्काळ आरोग्य तपासणी करावी. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी तातडीने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी केले आहे. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोले यांनी या ठिकाणी पाहणी करून करून ही इमारत ताब्यात घेऊन तेथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही केली.
र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी या वसतीगृहाचा अधिकृत ताबा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांच्याकडे दिला. यापूर्वीही कोरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचार्यांना राहण्यासाठी हे वसतिगृह उपलब्ध करून देण्यात आले होते.