बीड

शेतकर्‍यांचा एकही रूपया ठेवू नका, तात्काळ अनुदान वितरीत करा,जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला कडक आदेश


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : अतिवृष्टीच्या दुसर्‍या टप्प्यातील अनुदान शासनाकडून प्राप्त होवूनही अद्याप ते शेतकर्‍यांना मिळालेली नाही, यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाला असून त्यांची तळमळ लक्षात घेवून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आता अ‍ॅक्शन घेतली आहे. शेतकर्‍यांचा अनुदानाचा एकही रूपया ठेवू नका, त्यांना आलेल्या अनुदानाचे पैसे तात्काळ वितरीत करा, असे कडक आदेश त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सोडले आहेत. यामुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे.
दरवर्षी जिल्ह्यातील कोणत्यान कोणत्या नैसर्गिक संकटाला शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागते, या वर्षीच्या खरीप हंगामातही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीला तोंड द्यावे लागले, यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही सरकारने शेतकर्‍यांना तात्काळ मदत केली नाही, ज्यावेळी विरोधकांकडून गंभीर स्वरूपात टिका होवू लागली, त्यावेळी सरकार वठणीवर आले आणि नाईलाजाने सरकारला शेतकर्‍यांसाठी मदतीची घोषणा करावी लागली, अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी दहा हजार रूपयांची मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या घोषणेत म्हटले होते, त्यानुसार मदतीसाठी दोन टप्पे करण्यात आले, मागच्या आडीच महिण्यांपुर्वी पहिल्या टप्प्यात शेतकर्‍यांना पन्नास टक्के निधी वितरीत करण्यात आला होता, तर आडीच महिण्यांच्या प्रतिक्षेनंतर मदतीचा दुसरा हप्ता वर्ग केला. या दुसर्‍या टप्प्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी 1303 कोटी 49 हजार रूपयांचा निधी मिळाला, यापैकी एकट्या बीड जिल्ह्याला 153 कोटी 37 लाख 67 हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला, प्राप्त झालेला हा निधी तात्काळ जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर वर्ग केला, मात्र असे असतानाही जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना अद्याप दुसर्‍या टप्प्यातील ही रक्कम मिळालेली नाही, यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकर्‍यांची तळमळ लक्षात घेवून आता जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी अ‍ॅक्शन घेतली आहे. शेतकर्‍यांचे अनुदानाचे पैसे त्यांना तात्काळ वितरीत करा, त्यांचा एकही रूपया प्रशासनाकडे ठेवू नका, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यांच्या या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाबरोबरच तालुकास्तरावरील यंत्रणा आता गतीमान झाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!