अंबाजोगाई

अंबाजोगाईत चोरट्यांनी पतसंस्था फोडली, ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लंपास

अंबाजोगाई : शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील सायगाव नाका परिसरात असलेली अक्षय मुंदडा यांची अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था फोडून चोरट्यांनी ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.२१) सकाळी उघडकीस आली. मागील काही दिवसात अंबाजोगाई शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून भर चौकातील पतसंस्था फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.

शहरातील सायगाव नाका परिसरात स्व.मीनाताई ठाकरे चौकात अंबाजोगाई नागरी सह. पतसंस्थेचे कार्यालय आहे. शुक्रवारी दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर जमा झालेली २ लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम कुलुपबंद कपाटात ठेऊन सर्व कर्मचारी कार्यालय बंद करून निघून गेले. शनिवारी पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर उचकून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेली ५७ हजारांच्या चिल्लर नाण्यांसह दोन लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. शनिवारी सकाळी ६.३० वाजता ही चोरी उघडकीस आली असे पतसंस्थेचे व्यवस्थापक रामलिंग गुरुलिंगअप्पा सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष अक्षय मुंदडा यांनी खबर दिल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय कांबळे करत आहेत. मागील काही कालावधीत अंबाजोगाई शहरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकात दहशत पसरली आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद :

दरम्यान, पतसंस्थेसमोरील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत. पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. सदर फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. तसेच, पोलिसांना चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळाले असून ठशांची शहानिशा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!