गेवराई, दि. 7 ऑक्टोबर : खुनाच्या गुन्ह्यात दहा वर्षापासून शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले. त्याने ज्या व्यक्तीचा खून केला होता त्याच्या मुलाने वडिलांच्या खुनाचा बदल घेण्यासाठी प्राणघातक हल्ला चढवत त्या कैद्याला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. ही घटना गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे मंगळवारी सायंकाळी घडली.
भगवान शिवाजी पांढरे (रा. धोंडराई, ता. गेवराई) असे त्या कैद्याचे नाव आहे. दहा वर्षापूर्वी धोंडराईत प्रल्हाद शिवाजी पांढरे यांचा खून झाला होता. या गुन्ह्यात दोषी सिद्ध झाल्याने भगवान पांढरे मागील दहा वर्षापासून पैठणच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सहा महिन्यापूर्वी भगवान यास पॅरोलवर तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले. त्यावेळेपासून तो धोंडराई येथे स्वतःच्या घरी राहत आहे. मंगळवारी (दि.07) सायंकाळी 4.30 वाजता भगवान ग्राम पंचायत कार्यालयासमोर बसला असताना मयत प्रल्हाद पांढरे यांचा मुलगा महादेव प्रल्हाद पांढरे हा तिथे आला. माझ्या वडिलांचा खून करून सुद्धा तू गावात मोकळा फिरत आहेत, आता तुलाही जीवे मारतो असे म्हणत त्याने खिशातील चाकू बाहेर काढला भगवानच्या पोटात खुपसला आणि हातावरही वार केले. या घटनेमुळे गावात एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ ऐकून भगवानचा मुलगा सचिन यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली असता त्यांना वडील गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले. ताबडतोब त्यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने वडिलांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने पुन्हा त्यास बीडच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असे सचिन पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर फिर्यादीवरून महादेव प्रल्हाद पांढरे याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.