Uncategorized

मोदी सरकारला घेरण्यासाठी सोनिया गांधींनी बोलावली बैठक, उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता

दिल्ली, दि.26 (लोकाशा न्युज) ः केंद्र सरकारविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हात मिळवला आहे. यासाठी भाजपा सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली असू व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे. जीसटी तसंच करोना संकटामुळे राज्यांना झालेलं आर्थिक नुकसान याशिवाय जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी वारंवार होत असलेल्या मागणीवर सोनिया गांधी बैठकीत चर्चा करणार आहेत. २७ ऑगस्टला दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही बैठक होणार आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी जीएसटी काऊन्सिलची बैठक पार पडणार असून त्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. सर्व राज्यांचे अर्थमंत्री या जीएसटी काऊन्सिलचा भाग आहेत. या बैठकीत विरोधी पक्षातील मुख्यमंत्री १४ टक्के जीएसटी भरपाईची मागणी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, विद्यार्थी तसंच इतर विषयांवर केंद्र सरकारविरोधात भक्कमपणे उभं राहत एकत्र लढणं हा बैठकीचा मुख्य मुद्दा आहे. ममता बॅनर्जी यांनी आतापर्यंत दोन वेळा केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी यासाठी पत्र लिहिलं आहे. मात्र केंद्र सरकार परीक्षा घेण्यावर ठाम आहे. सुरक्षेचे सर्व उपाय करत जेईई आणि नीट परीक्षा होणार असल्याचं केंद्राच म्हणणं आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीवरही चर्चा होईल. या बैठकीत काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनाही आमंत्रित केलं जाणार होतं, मात्र काँग्रेसचा विरोध असल्याने निर्णय मागे घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत उपस्थित राहण्यास नकार दिला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!