बीड

धान्य मोफतच, जिल्ह्यासाठी आलेले तीन लाख क्विंटल रेशन जनतेने उचलावे


बीड : बीड जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी मिळून तीन लाख तीस हजार क्विंटल धान्य आले आहे. हे धान्य जनतेने उचलावे, त्याच प्रमाणे ज्या सहा शहरांमध्ये संचारबंदी आहे, त्या ठिकाणी गडबड न करता संचारबंदी संपल्यानंतर माल उचलावा. जिल्हा आता रेशन धान्य वाटपात राज्यात क्रमांक एक कडे वाटचाल करत आहे. मे महिन्यात बीड जिल्ह्यात क्रमांक एक होता. त्यामुळे प्रशासनाच्या कामाला गती देण्यासाठी प्रत्येक कार्डधारकांना आपला माल उचलावा आणि नियमाप्रमाणे पावती घ्यावी, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात अंत्योदय, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य योजना आणि अंत्योदय योजना अंतर्गत रेशन धान्य आलेला आहे. त्याप्रमाणे मोफत मिळणारा माल आलेला आहे. जुलै महिन्यासाठी सहा हजार तीनशे छप्पन मेट्रिक टन तांदूळ आणि दहा हजार एक्काहत्तर मेट्रिक टन गहू तर ऑगस्ट महिन्यासाठी सहा हजार तिनशे मेट्रिक टन तांदूळ आणि दहा हजार एक्काहत्तर मेट्रिक टन याप्रमाणे दोन महिन्याचे मिळून एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे चोपन्न क्विंटल रेशन धान्य आलेले आहे. जनतेने हे धान्य घेऊन रेशन दुकानदाराकडून ई-पॉज मशिन मधील पावती घेणे आवश्यक आहे. जेव्हा माल उचललेला आहे, तेवढाच पावतीवर नमूद आहे का ? शासन नियमाप्रमाणे दुकानदार पैसे घेतो का ? या बाबी देखील जनतेने त्याच वेळी तपासून घ्याव्यात. म्हणजे शिधापत्रिकाधारकांची फसवणूक होणार नाही. बीड जिल्हा मे महिन्यामध्ये राज्यात आलेल्या ज्यादा धान्याच्या वाटपात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आला होता. आताही जिल्हा त्याच दिशेने वाटचाल करत असून यासाठी शिधा पत्रिकाधारकांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. रेशन मालातील काळाबाजार थांबविण्यासाठी प्रत्येक शिधापत्रिकाधारक आपल्या हक्कासाठी ग्राहक म्हणून दक्ष असायला हवा. त्यामुळे नियमाप्रमाणे धान्य घ्यावे आणि नियमाप्रमाणेच पैसे देऊन पावती घ्यावी. जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सचिन खाडे यांच्या सक्रिय कामकाजामुळे रेशन धान्य हे या काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने जनतेला मिळाले आहे. हे जनता देखील मान्य करते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!