बीड

विकास हीच माझी जात, संधी द्या, मतदान व्यर्थ जाणार नाही, केजच्या कार्यकर्ता मेळाव्यात पंकजाताई मुंडेंचा शब्द,पंकजाताई सर्व अठरापगड जातींना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व – विक्रमी मताधिक्यासाठी रमेश आडसकरांनी कंबर कसली

केज ।दिनांक १५।
आपला जिल्हा,आपली माणसं एवढाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन मी सत्तापदाच्या काळात केवळ विकासाचं राजकारण केलं. हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही विकासाच्या प्रवाहात पुढे जावा हे माझं स्वप्न आहे. तुम्ही र्‍हदयावर हात ठेवुन माझ्यावर विश्वास ठेवा, दिलेलं मतदान वाया जाणार नाही, विकास हीच माझी जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील तेव्हा त्यांच्याकडून क्षणोक्षणी जिल्ह्याचं भाग्य उजळण्यासाठी मी मिळालेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय रहाणार नाही या शब्दांत लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडेंनी मतदारांना आवाहन केले. दरम्यान पंकजाताई म्हणजे सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवुन चालणारी शक्ती असुन मागच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेना पाच लाख मते मिळाले. मात्र पाच वर्षात कुठल्या बिळात लपले? हा सवाल करत आडसकरांनी जातीपातीपेक्षा पुढे जावुन सामान्य जनतेच्या हितासाठी पंकजाताईचं नेतृत्व जपावे एवढेच नव्हे तर आम्ही सर्व खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे असल्याचे प्रतिपादन केले.

    केज येथे शारदा इंग्लिश स्कुल प्रांगणात महायुतीच्या कार्यकर्त्याचा संवाद मेळावा पार पडला. त्याप्रसंगी मान्यवर बोलत होते. जनसमुदायासमोर बोलताना पंकजाताई पुढे म्हणाल्या, माजलगाव मतदारसंघा एवढंच लक्ष्य आडसकरांचं केज तालुक्यात आहे. मागील पंधरा वर्षापासुन आम्ही एकत्र काम करतो. सामान्य माणुस हाच खर्‍या अर्थाने माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदु आहे हे सांगताना मी जिल्ह्यात केवळ विकासाचं राजकारण केलं, त्यामुळे कुणाचीही तक्रार माझ्याविरोधात व्यक्तीद्वेषाची नाही हीच माझ्या कामाची पावती म्हणावी लागेल. विरोधकांना प्रचारात माझ्या विरोधात मुद्दाही नाही. पालकमंत्री म्हणून केलेल्या विकासाची कामं निवडणुक प्रचारात ठिकठिकाणी गेल्यानंतर लोक मलाच सांगतात की, ताई तुमच्यामुळे ही योजना आली. मी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. वेगवेगळ्या चर्चा सामाजिक करणावर जेव्हा पुढे येतात त्यावेळी यात माझा गुन्हा काय? हा सवाल करत त्यांनी तुम्ही र्‍हदयावर हात ठेवुन मला मतदान करा. तुम्ही टाकलेला विश्वास तिळाएवढा ढळू न देता केंद्र सरकारच्या सर्व योजना एवढेच नव्हे तर दहा हजार तरूणांना रोजगार मिळेल एवढा उद्योग आपल्या जिल्ह्यात आणुनच दाखवेल. कॅन्सर अद्ययावत हॉस्पीटल उभा करून गोरगरिबांच्या आरोग्य रक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी तुमची केवळ सेवक

माझ्या रूपाने फार मोठी संधी तुम्हाला चालुन येत आहे. त्यामुळे जात, धर्म नाराजी एका बाजुला तर मिळत असलेली संधी दुसर्‍या बाजुला. वैचारिक विचार जर केला तर केवळ एकदा संधी देवुन बघा, मी सेवकाच्या भुमिकेत काम केल्याशिवाय रहाणार नाही. संविधानिक पदाची संधी सामान्य जनतेच्या हितासाठी असते. जे मी पालकमंत्री असताना करून दाखवलं. अगोदर मी केले हे सांगताना बीड-नगर-परळी रेल्वेचा प्रश्न आणि राष्ट्रीय महामार्ग बांधणी केली. ज्यामुळे देशाच्या नकाशावर आपला जिल्हा आला. शत्रुला देखील मी विकासाच्या कामात मदत केली. कुणालाही वैयक्तिक द्वेषापोटी त्रास दिला नाही. कुठल्याही संकटात आम्ही धावुन आलो. मग पाच वर्षे विरोधी उमेदवार कुठे होते? हा सवाल त्यांनी केला.

बैठकीचे रूपांतर सभेत

भाजपा नेते रमेश आडसकरांनी नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी बोलवलेल्या बैठकीचे रूपांतर जाहिर सभेत झाले. त्यात बोलताना पंकजाताई ह्या केवळ विकासाची वाघीण असुन मागच्या काही वर्षापासून त्यांना आम्ही जवळुन पहातो. जातीवाद त्यांच्या स्वभावात नक्कीच नाही. कारण विकासाच्या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक घेतलेली भुमिका ज्यामुळे आपल्या जिल्ह्याचे राजकारण त्या काळात व्यक्तीद्वेषाकडे कधीच गेलं नाही. बजरंग सोनवणे यांना मागच्या निवडणुकीत बर्‍यापैकी मते मिळाली. पण पाच वर्षात कधीच यांनी सामान्य जनतेला तोंड दाखवलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. जुन्या आणि नव्या लोकांची सांगड घालुन मी सामान्य जनतेची सेवा करतो. त्यामुळे गोरगरिबांचा विश्वास आमच्यावर असुन पंकजाताईला प्रचंड मताधिक्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपला खासदार निवडुन आल्यानंतर केंद्रात वजनदार मंत्री होणार त्यामुळे जिल्ह्याचं भाग्य निश्चित उजळेल हे सांगताना त्यांनी मराठा आरक्षणावर मुंडे कुटुंबियांनी राजकारण न करता नेहमीच आपल्याला पाठिंबा दिल्याचे ठणकावुन सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते ऋषी आडसकर यांनी केले. केज नगर परिषद गट नेता हारूण इनामदार यांनी भगिनी पंकजाताईला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मतदान करतील हे सांगताना स्व.मुंडे साहेबांंचं स्वप्न साकार करण्याची क्षमता ताईमध्ये असल्याने आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू हे सांगितले.

यावेळी बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सीताताई बनसोड, भागवतदादा गोरे, नाना गुरूजी, डॉ.योगिता थोरात, धैर्यशील देशमुख, सुमन धस, उषा मुंडे, उत्तमराव आणे, गोरख रसाळ, गौतम चौधरी, सर्जेराव वाघमोडे, युवराजदादा काळे, दिलीपआबा गुळभिले, संदिप पाटील, दिपक शिंदे, महादेव आदमाने गुरूजी आदीसह विविध गावचे सरपंच,चेअरमन, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!