पाटोदा

लोकाशाचा दणका, पवनराजे निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत आत्महत्या प्रकरणी तिघा मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ;सोनपेठ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळाचाही समावेश


दिलीप बद्दर
परळी वैजनाथ दि १२ (लोकाशा न्यूज) :- परळी शहरातील जलालपूर रोडवरील पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड चे अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत यांच्या आत्महत्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तिघा आरोपींसह सोनपेठ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. सावंत यांनी आत्महत्या करून सहा दिवसांचा कालावधी लोटला तरीही अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता तेव्हा दैनिक लोकाशाने आवाज उठवला होता परिणामी आज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पवनराजे निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी यांनी प्रेमपन्ना नगर मधील फ्लॅटवर ६ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सहकार क्षेत्रात खळबळ माजली होती. त्यांनी आत्महत्या कशामुळे केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी घटना घडली त्यावेळी सावंत याच्या खिशात कांही चिठ्ठ्या सापडल्या असून त्यामध्ये काही लोकांची नावे असल्याचा संशय दैनिक लोकाशा ने व्यक्त केला होता. सदर घटनेस सहा दिवसांचा कालावधी लोटून गेला असला तरीही मयत सावंत यांच्या घरच्यांनी फिर्याद का दिली नाही किंवा पोलिसांनी अद्याप कारवाही का केली नाही किंवा त्या चिठ्ठ्यांमध्ये दडलय काय याबाबत शहरात उलटसुलट चर्चा होत असल्याबाबतही आवाज उठवला होता.
दैनिक लोकाशाच्या बातमीची गंभीर दखल घेत आज मयत पवनराजे निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांची पत्नी जयश्री प्रल्हाद सावंत राहणार प्रिया नगर परळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी प्रल्हाद काळे, बँकेचे सचिव गोविंद भरबडे, सचिन भरबडे व सोनपेठ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी मानसिक त्रास देऊन सोनपेठ बँकेकडून आलेली रक्कम ४८ लाख रुपये परत करण्यास सांगून संगणमत करून आपले पती प्रल्हाद सावंत यांना मानसिक त्रास व धमक्या दिल्या व त्यांच्या ह्या मानसिक त्रासाला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केली.
दरम्यान सदर फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपी प्रल्हाद काळे, त्याचे सचिव गोविंद भरबडे, सचीन भरबडे, यांच्यासह सोनपेठ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे गु र नंबर २०/ २०२४ दिनांक १२/२/२०२४ रोजी कलम ३०६, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने आणि पंडित पांचाळ करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!